Sun, Nov 18, 2018 18:09होमपेज › Marathwada › मुद्रा योजनाद्वारे स्वत:च्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण

मुद्रा योजनाद्वारे स्वत:च्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMबीड : दिनेश गुळवे

स्किल (गुणवत्ता) असूनही केवळ पैशांअभावी व्यवसाय उभा करू न शकणार्‍या तरुणांना मुद्रा योजनांतून तब्बल दीडशे कोटींचे कर्ज मिळाले आहे. या रकमेतून तरुणांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले असून दुसर्‍याकडे रोजंदारी करणार्‍या काही तरुणाचे आता स्वत:च्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कर्जासाठी बँकांच्या दारात खेटे मारणार्‍या या तरुणांच्या स्वप्नांना मुद्रा, स्टँड अप इंडिया या योजनांमुळे पंख मिळाले आहेत. 

शासकीय नोकर्‍यांची घटती संख्या, दोन ते तीन वर्ष न होणारी नोकरभरती, नोकरभरती झाल्यास निघणार्‍या तुटपुंजा जागा व अशा परिस्थितीत नोकरभरतीसाठी लाखोंवर येणारे अर्ज यामुळे उच्चशिक्षीत व गुणवत्ता असलेला तरुणही निराश झाला होता. एकीकडे उच्चशिक्षीत असून नोकरी नाही तर दुसरीकडे स्किल असूनही पैशांअभावी व्यवसाय सुरू करण्यत अडचणी येत होत्या. अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या तरुणांसाठी मुद्रा व स्टँड अप इंडिया या योजना आशेचा किरण ठरल्या आहेत. 

किराणा दुकान, कुशन वर्क्स, वेल्डिंग दुकान, कापड दुकान, पंक्‍चर काढण्याचे दुकान, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक, हॉटेल यासह विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना अडचणी येत होत्या. रोजगारासाठी स्थलांतर करणेही सर्वच तरुणांना जमेल असे नाही. यासह पैशांची अडचणही सर्वात महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत मुद्रा योजनेंतर्गत तरुणांना कर्जवाटप करण्यात आले. त्यामुळे एक हजारावर तरुणांचे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण झाले. मुद्रा योजनेंतर्गत शिशू कर्ज (50 हजार), किशोर कर्ज (एक ते पाच लाख) व तरुण कर्ज दहा लाख रुपयांपर्यंत देण्यात आले आहे. हे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, एचडीएफसी बँक अशा राष्ट्रीयीकृत बँकांतून देण्यात आले आहे.