होमपेज › Marathwada › दोन अधिकार्‍यांमध्ये फ्री स्टाईल

दोन अधिकार्‍यांमध्ये फ्री स्टाईल

Published On: Jun 12 2018 12:06PM | Last Updated: Jun 12 2018 12:06PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात यावर्षी पुन्हा हाणामारीची घटना घडली. यावेळी विद्यार्थी-अधिकारी याऐवजी अधिकारी-अधिकारी असा सामना झाला. दोघांनी एकमेकांना धुतले. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालकाच्या केबिनसमोर सोमवारी (दि.11) सायंकाळी ही घटना घडली. हाणामारी करणारे अधिकारी ‘क्लास थ्री आणि क्लास टू’ दर्जाचे आहेत. अधिकार क्षेत्राच्या मुद्यावरून दोघांत ठिणगी पडल्याचे समजते.

विद्यापीठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालकांचे पी. ए. (स्वीय सहायक) नितीन गायकवाड आणि बी.एस्सी. कक्षप्रमुख सतीश दवणे यांच्यात हा राडा झाला. बी.एस्सी.च्या एका विद्यार्थ्याचा फेरमूल्यांकन अर्ज स्वीकारावा म्हणून गायकवाड यांनी शिफारस केली होती. मात्र, तो दवणे यांनी स्वीकारला नाही. मुदत संपली आहे. गायकवाड माझे प्रमुख नाहीत, असे म्हणत दवणे यांनी अर्ज परत पाठविला. त्यानंतर हा विद्यार्थी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. दिगंबर नेटके यांच्याकडे गेला. नेटके यांनी संबंधित मुलाचे म्हणणे ऐकून अर्ज स्वीकारण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे दवणे यांनी अर्ज स्वीकारला. मी सांगितला तर नाही आणि नेटकेंनी सांगितला तर स्वीकारला कसा म्हणत गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. आज सायंकाळी सहा वाजता दवणे नेटकेंना भेटण्यासाठी आले, तेव्हा शिपायाने त्यांना आत जाऊ दिले नाही.

आत का जाऊ देत नाही, अशी विचारणा दवणे यांनी केल्यानंतर त्याने गायकवाड यांच्याकडे बोट दाखविले. अडविण्याचे कारण विचारण्यासाठी दवणे हे गायकवाड यांच्याकडे गेले तेव्हा दोघांत आधी हमरीतुमरी आणि नंतर हाणामारी झाली. आसपास उपस्थित अन्य कर्मचार्‍यांनी भांडण सोडविले. परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके केबिनबाहेर आले. तेव्हा भांडण मिटलेले होते. या भांडणात दोघांनाही मार लागल्याचे समजते.

यानंतर हा विषय कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्याकडे गेला. तेथे काय झाले हे समजू शकले नाही. कारण माहीत नाही - नेटके गायकवाड आणि दवणे यांच्यात भांडण झाल्याच्या वृत्ताला परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दुजोरा दिला. तथापि, भांडणाचे कारण माहीत नसल्याचे ते म्हणाले. वाद संपल्यानंतर आपण केबिनबाहेर आलो. वादाचे कारण जाणून घेऊन त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. कारवाई करा दांडगे परीक्षा विभागात हाणामारीच्या घटना नेहमीच घडत आहेत.

विद्यापीठासाठी ही बाब भूषणावह नाही. ज्यांच्यात हाणामारी झाली त्या दोन्ही अधिकार्‍यांवर प्रशासनाने कारवाई करावी. त्यामुळे जरब बसेल आणि असे प्रकार करण्यास पुन्हा कोणी धजावणार नाही, असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल दांडगे म्हणाले. मस्ती आली का, माज आला का ? विद्यार्थ्याचा अर्ज फेटाळल्यानंतर शिफारस करणारा अधिकारी व कक्षप्रमुखांत दूरध्वनीवर वाद झाला. यात एका अधिकार्‍याने दुसर्‍याला उद्देशून मस्ती आली का, माज आला का, पाहून घेईन यासह अर्वाच्य भाषा वापरल्याचे समजते. त्यावरून वाद टोकाला गेल्याचे समजते.