Wed, Jan 16, 2019 05:24होमपेज › Marathwada › उमरगा: कर्जबाजारीपणामुळे दांपत्‍याची आत्‍महत्‍या

उमरगा: कर्जबाजारीपणामुळे दांपत्‍याची आत्‍महत्‍या

Published On: Feb 05 2018 10:45PM | Last Updated: Feb 05 2018 10:45PMउमरगा: प्रतिनिधी

कर्जाच्या विंवेचनेतून पती-पत्नीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील बोरी येथे सोमवारी (दि. ५) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील बोरी (उस्मानाबाद) येथे  सचिन ज्ञानदेव मदने (वय ३५) व पत्नी छबुबाई सचिन मदने (वय ३२) यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरात स्‍वत:ला बंद करून स्वतःला पेटवून घेतले. दरम्यान गावात लग्न असल्याने गावातील सर्व नागरिक लग्नात होते. त्यावेळी सचिनचे आई-वडील व दोन मुले, दोन मुली हे लग्नाच्या ठिकाणी होते. दुपारी बाराच्या सुमारास घरातून धुर येत असल्याचे नागरिकांना दिसून आल्यावर नागरिकांनी घराकडे धाव घेतली. जळालेल्या अवस्थेतील सचिन, छबुबाई यांना उपचारासाठी लातुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दोघांचाही मृत्यू झाला. 

सचिन मदने यांच्यासह पत्नी यांच्या नावे तीन ते चार लाख रुपये खासगी व बँकेचे कर्ज असल्याने घरी कोणीही नसताना कर्जाच्या विंवेचनेतून दोघांनी स्वतःला पेटवून घेतल्याचे सांगितले. याबाबत नेमके कारण काय हे तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिस निरीक्षक गुंडिले यांनी सांगितले. दरम्यान सदरच्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती.