होमपेज › Marathwada › जिल्हा प्रशासन मुख्यालयी नागरी सुविधांचा बोजवारा

जिल्हा प्रशासन मुख्यालयी नागरी सुविधांचा बोजवारा

Published On: Mar 22 2018 2:01AM | Last Updated: Mar 22 2018 1:56AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाच्या मुख्यालयीच नागरिकांसाठी असलेल्या सुविधांचा बोजवारा उडाला आहे. शासकीय कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात येणार्‍या नागरिकांना मात्र प्रशासनाच्या सर्वसामान्यांकडील दुर्लक्षीतपणाची अनुभूती येवू लागली आहे.  जिल्हा कचेरीत येणार्‍या नागरिकांना पिण्याचे पाणी व अत्यावश्यक सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच महत्वाच्या महसुली विभागांसह तहसील कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयही आहे. येथे शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. अत्यावश्यक सुविधांचा मोठा अभाव असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने कार्यालयातील अधिकार व कर्मचार्‍यांची दालने वातानुकुलीत केली आहेत. प्रत्येक कक्षात कुलर व कर्मचार्‍यांसाठी वॉटरफिल्टर बसवले आहे. शिवाय सुसज्ज अशी कँटीनही जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे. उन्हाळा लागला तरी जिल्हा प्रशासनाने मात्र अद्याप मुबलक प्रमाणणात पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली नाही. कार्यालयात पहिल्या मजल्यावर असलेल्या दोन वॉटर फिल्टरपैकी एकच चालू असून एक पुर्णपणे बंदावस्थेत आहे.

तहसीलसमोर सुरू केलेली पिण्याच्या पाण्याची सुविधा  अनेक वर्षापासून बंद आहे.  तहसील कार्यालयात तर पिण्याचे पाणी तर नाहीच परंतु बंद वस्थेतील वॉटरफिल्टर दिमाखात उभे करुन ठेवले आहे. तेथे असलेल्या शौचालयांची अवस्था दयनिय असून तेही बंदावस्थेत आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेवर लक्ष केंद्रीत करुन वेळेत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी होेत आहे. 

Tags : marathwada parbhani news,District administration headquarter, civil facilities