होमपेज › Marathwada › प्रशिक्षणार्थी दांडीबहाद्दर; अधिकारी गैरहजर

प्रशिक्षणार्थी दांडीबहाद्दर; अधिकारी गैरहजर

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:53PMपरभणी : दिलीप माने 

महाराष्ट्र शासनाच्या विद्या प्राधिकरणाकडून निर्देशित असलेल्या गणित संबोध विकसन प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थींनी दांडी मारल्याचा प्रकार 14  मार्च रोजी येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र (डायट) येथील प्रशिक्षणात घडला. उत्कृष्ट आयोजन करूनही विषय शिक्षकांनी गांभीर्य ठेवले नसल्याने सदरील प्रशिक्षण केवळ औपचारिकताच  असल्याचे निदर्शनास आले. 

गणित विषयातील काठीण्यता कमी व्हावी, विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा व्हावा, नवनवीन क्‍लृप्त्या विकसित व्हाव्यात व विषयाच्या अध्यापनासंदर्भात विचारमंथन व्हावे, गणिव विषयाची गुणवत्ता वाढावी, यासाठी हे प्रशिक्षण शासनाच्या निर्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत दिल्या जाते. यासाठी परभणी शहरातील एकूण 67 शाळांतील गणित विषयाच्या शिक्षकांना प्रशिक्षणार्थी म्हणून बोलविण्यात आले होते, परंतु शिक्षकांनी मात्र विद्यार्थी व विषय केंद्रित या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवून प्रशिक्षणासाठी मिळालेल्या वेळेला सुटीत रूपांतर करून स्वतःची खाजगी कामे पूर्ण केली.

डायटच्या सभागृहात जबाबदार अधिकार्‍यांच्या गैरहजेरीत केवळ औपचारिकता म्हणून सकाळी 10 वाजता प्रशिक्षण सुरू झाले. गणित सुलभक संजय पकवाणे, पुरी, खांडे, भैरट हे प्रशिक्षण देत होते. मात्र मध्यंतरापर्यंत केवळ 40 प्रशिक्षणार्थ्यांची नोंद होती. त्यातीलही  काही प्रशिक्षणार्थी नोंदणी करून साहित्य घेऊन घरी परत जात होते. सकाळी 10 ते 5 या वेळेत गणित विषयातील विविध संकल्पना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, परंतु अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी या प्रशिक्षणाला दांडी मारली. 

विद्याथ्यार्ंच्या हितासाठी , गणिताची काठीण्य पातळी कमी करण्यासाठी असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाला  शिक्षकांनी जाणीवपूवर्क दांडी मारली आहे. प्रशिक्षणासाठी आलेल्या निधीची योग्य विल्हेवाट लावून  प्रशिक्षणाची औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करावी, दांडीबहाद्दर शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी जेणेकरून शिक्षण विभागातील महत्त्वाच्या प्रशिक्षणांना दांडी मारणे कमी होईल. 

निधीचा विल्हेवाट लावण्यासाठी चालला प्रशिक्षणाचा खटाटोप ः प्रशिक्षणासाठी आलेल्या निधीचा गैरमार्गाने विल्हेवाट लावण्याचा प्रकार सदरील प्रशिक्षणात सुरू आहे. शासनाने चांगल्या कामासाठी दिलेला निधी येथील अधिकारी व कर्मचारी शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे योग्य वापरण्यात येत नाही. प्रशिक्षणार्थी व आयोजकांनी मिळून शासनाच्या गणित प्रशिक्षणाचा खेळखंडोबा करून उद्दिष्ट्यपूर्ती दूर मात्र मलिदा लाटण्याचाच सपाटा लावला आहे, असा आरोप एका प्रशिक्षणार्थींनी केला.

गणित विषयातील काठीण्यता कमी करून विद्यार्थ्यांना ते सहज समजेल अशा भाषेत अध्यापन करण्यासंदर्भात आयोजित या प्रशिक्षणाला शहरातील शिक्षकांनी उपस्थिती लावणे अनिवार्य आहे. यासाठी मनपाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी सदरील प्रशिक्षणार्थींना सूचित करून वेळेत माहिती देणेदेखील महत्त्वाचे आहे. मात्र सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे मनपाच्या शिक्षण गटसाधन केंद्रातील अधिकार्‍यांनी गांभीर्य बाळगले नसल्याचे दिसून आले

महापालिकेचे अधिकारी शहरातील शाळांकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे आयोजित केलेल्या या प्रशिक्षणाकडे या शिक्षकांनी पाठ फिरविली. अधिकार्‍यांनी जर वेळेत लक्ष घातले असते तर हे प्रशिक्षण यशस्वी झाले असते आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला असता. -संतोष राजूरकर, गटशिक्षणाधिकारी