Tue, May 21, 2019 19:08होमपेज › Marathwada › राज्यातील जिल्हा परिषद अभियंते करणार सामूहिक रजा आंदोलन

राज्यातील जिल्हा परिषद अभियंते करणार सामूहिक रजा आंदोलन

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 12 2018 10:25PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत कार्यरत असणार्‍या अभियंता संवर्गाच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नाही. यामुळे राज्यभरातील अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील 34 जिल्हा परिषदेतील बांधकाम, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सर्व अभियंते व संघटनेचे पदाधिकारी येत्या 19 व 20 मार्च रोजी सामूहिक रजा आंदोंलन करणार असून 15 मार्चला काळ्याफिती लावून कामकाज करणार असल्याचे निवेदन राज्याच्या ग्रामविकास सचिवांना दिले आहे. 

जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने मागील 5 ते 6 वर्षांपासून संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन स्तरावर अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने तब्बल 9 वेळेस ग्रामविकास विभागाचे मंत्री व सचिव यांच्यासोबत संघटनेच्या बैठकाही आयोजित झाल्या. 

बैठकांमधून मंत्री यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत वारंवार सकारात्मक आश्‍वासने दिली. तसेच विभागाचे सचिव हेही मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकारात्मक असून अद्याप एकाही मागणीची पूर्तता झाली नाही. मागण्यांमध्ये नोंदणीकृत संघटनेला मान्यता देणे, दरमहा 10 हजार मासिक वेतन देणे, नवीन उपविभाग निर्माण करणे, ग्रामविकास विभागाचे आदेश निर्गमित करणे आदींचा समावेश आहे. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषद अभियंत्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली. 

 निवेदनावर जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे राज्याचे महासचिव सुहास धारासूरकर, कार्याध्यक्ष सतीश मारबदे, अध्यक्ष राजू शिंदे आदींंच्या सह्या आहेत.