Fri, Mar 22, 2019 05:54
    ब्रेकिंग    



होमपेज › Marathwada › खंडित वीजपुरवठा; बागायतदार संकटात

खंडित वीजपुरवठा; बागायतदार संकटात

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 11:18PM



पाथरी : सुधाकर गोगे

तालुक्यातील बहुतेक गावाला महावितरण कंपनीच्या वतीने पुरवठा केला जाणारा विद्युत पुरवठा सतत खंडित होत आहे. यामुळे मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असतानाही पाण्याअभावी पिके सुकून जात आहेत. केवळ विजेअभावी बागायती पिकांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून पाथरी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी देखील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकर्‍यांना मोठा फटका सहन करावा लागला, पण पैठण येथील नाथसागरात मुबलक पाणी असल्याने या कालव्यात प्रवाही पाणी सुरू आहे. तालुक्यातून 22 कि.मी.पर्यंत हा कालवा जात असल्याने विहीर आणि बोअरला पाणी  वाढलेले आहे. यामुळे शेतकर्‍यांनी उसाची मोठी लागवड  केली आहे. शिवाय खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादन न झाल्याने जून महिन्यात बी-बियाणे खरेदी करण्यासाठी मदतीचा हातभार मिळेल यासाठी उन्हाळी भुईमुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली.पण सतत वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

पाथरी तालुक्यातील शेतकर्‍याची अवस्था आई जेऊ देईना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली आहे. दुष्काळात पाणी नाही, पाणी आहे तर वीजपुरवठा खंडित, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. बाबूलतार, रेणापूर आणि पोहेटाकळी या तिन्ही गावांना गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा सारखा लपंडाव सुरू असल्याने बागायतदार शेतकरी अक्षरशः वैतागून गेले आहेत.

Tags : Marathwada, Disrupted, power, supply, Farmer, trouble