Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Marathwada › थकीत बिलामुळे शाळांचा वीजपुरवठा खंडीत

थकीत बिलामुळे शाळांचा वीजपुरवठा खंडीत

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 1:58AMआर्वी : जालिंदर नन्नवरे

विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच माहिती तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘शाळा तेथे ई-लर्निंग’ हा उपक्रम सुरू केला आहे. याला जिल्हाभरातील शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु याला वीज बिलाच्या थकबाकीचे ग्रहण लागत आहे. तालक्यातील अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित केल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

शिरूर तालुक्यातील जवळपास शंभर टक्के शाळांमध्ये डिजिटलचा उपक्रम राबविण्यात आला आहे. सुरुवातील केवळ लोकसहभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत होता, परंतु याचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने ई-लर्निंगसाठी पुढाकार घेणार्‍या शाळांना आर्थिक मदत देण्याची योजना हाती घेतली. या योजनेच्या माध्यमातून संबंधित शाळांना प्रत्येकी दहा हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. दरम्यान, सदरील योजनेमुळे ई-लर्निंग उपक्रमास मोठ्या प्रमाणात गती मिळाली. असे असतानाच दुसरीकडे वीज वितरण कंपनीकडून थकीत वीज बिलापोटी शाळांचे विद्युत कनेक्शन खंडित करण्यात येत आहे. 

आजवर सुमारे 25 च्यावर शाळांची वीज तोडण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांतील ई-लर्निंग सुविधा अक्षरश: अडगळीस पडली आहे. उपक्रमावर लाखो रुपये खर्च होऊनही त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत नसल्याचे दिसून येते. शासनाने चार-पाच महिन्यांपूर्वी शाळानिहाय थकीत वीज बिलाची माहिती मागविली होती. जिल्हा परिषदेकडूनही ती तातडीने सादर करण्यात आली, परंतु आजतगायत ना वीज बिलाची रक्कम उपलब्ध करून दिली ना बिल माफ केले. परिणामी वर्षभरापासून शाळा अंधारात आहे.