होमपेज › Marathwada › गारपीटग्रस्तांच्या आशा पल्लवित

गारपीटग्रस्तांच्या आशा पल्लवित

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 05 2018 12:42AMहिंगोली : प्रतिनिधी

गेल्या पंधरवड्यामध्ये गारपीटसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. यात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते. शासनाने संबंधित अधिकार्‍यास तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर केला. शासनाने अशा गारपीटग्रस्तांना पावणेपाच कोटींचा निधी नुकताच मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या असून, काही दिवसांतच शेतकर्‍यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये 11 व 12 फेब्रुवारी या दरम्यान गारपीटसह अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये रब्बीतील गहू, हरभरा यांसह करडई, आंबा, मोसंबी, भाजीपाला आदींचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने संबंधित अधिकार्‍यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या पथकाने तत्काळ नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यास सुरूवात केली होती. यासंदर्भात सविस्तर माहितीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. 

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाला माहिती दिली. तसेच लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार अशा गारपिटीने नुकसान झालेल्या सुमारे 2 हजारांवर अधिक शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात 3 हजार 932 हेक्टर जिरायत, 1 हजार 427 हेक्टर बागायत तसेच 40 हेक्टर बहुवार्षिक पिकांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. यासाठी तब्बल 4 कोटी 67 लाख 41 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास मंजूर करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात आली आहे.

शासन नियमानुसार शेतीपिकांचे व बहुवाषिर्र्क फळपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर रक्कम नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असून त्यासंदर्भात शासनाकडून संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.