Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण: खासदार हिना गावितांच्या गाडीची तोडफोड 

मराठा आरक्षण: खासदार हिना गावितांच्या गाडीची तोडफोड 

Published On: Aug 05 2018 4:33PM | Last Updated: Aug 05 2018 4:57PMधुळे: प्रतिनिधी

धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातून नियोजन समितीच्या बैठकीतून बाहेर जाताना भाजपाचे खासदार हिना गावीत यांच्या गाडी समोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी काही कार्यकत्यांनी थेट गाडीवर चढून गाडीची तोडफोड केली. यावेळी आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत काही पोलीस जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीसांनी 10 ते 15 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तर कार्यकत्यांना सोडण्याची मागणी करत आंदोलकांनी जेलभरो करण्याचा इशारा दिला आहे.

धुळयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गेल्या 16 दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणे सुरू होते. आज या ठिकाणी आंदोलकांनी कुटुंब मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यासाठी मोठया प्रमाणावर महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यातच आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली होती. यासाठी पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्यासह खासदार हिना गावीत, आमदार अनिल गोटे, आमदार काशीराम पावरा आणि अन्य महत्त्वाचे अधिकारी येणार असल्याने आंदोलकांमध्ये देखील जोष आला होता. 

गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन सुरू असतांना जिल्हा प्रशासनासह या लोकप्रतिनिधींनी साधी दखल घेऊन चर्चा देखील केली नसल्याने आंदोलकांमध्ये संतप्त भावना होती. त्यातच पालकमंत्री आणि रोहयो मंत्री यांचा ताफा बैठकीसाठी आला असता आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे या मंत्र्यांनी आंदोलकांबरोबर चर्चा करण्याची तयारी दाखवली. पण यावेळी गेल्या 16 दिवस दखल न घेतल्याच्या कारणावरून या आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे मंत्री बैठकीसाठी सभागृहात रवाना झाले. यानंतर आमदारांच्या गाडयांसमोर देखील आंदोलकांनी निषेधाची घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान दुपारी दोन वाजेपर्यंत बैठक आटोपल्यानंतर मंत्री आणि आमदार व खासदार यांच्या गाडया कार्यालयातून बाहेर पडण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे पाहुन मराठा आंदोलकांनी प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला. तर पोलिसांनी हे प्रवेशद्वार उघडण्यासाठी जोर लावण्यास सुरूवात केली. 

या दरम्यान प्रवेशद्वार उघडल्याने आंदोलक थेट कार्यालयाच्या आवारात गेले. यावेळी आवारात बाहेर येण्याच्या तयारीत असणारी खासदार हिना गावीत यांच्या गाडीवर काही आंदोलक चढून घोषणाबाजी देऊ लागले. तर काही कार्यकत्यांनी गाडीच्या काचेवर पायाने वार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे काच फुटल्याने खा. गावीत यांनी त्यांच्या अंगरक्षकांनी गाडीबाहेर काढले. यानंतर खा. गावीत यांनी थेट पालकमंत्री दादा भुसे आणि पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्यासह 10 ते 15 आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलकांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकत्यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अधिका-यांबरोबर बंद दाराआड चर्चा केली. यात कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान पोलीस प्रशासनाने आंदोलकांबरोबर झालेल्या झटापटीत पोलीस देखील जखमी झाल्याचा दावा केला असून गुन्हा दाखल करण्याच्या हालचाल सुरू केली आहे. तर दुस-या बाजुला कार्यकत्यांनी आंदोलकांना न सोडल्यास जेलभरो करण्याचा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र केले आहे.