Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Marathwada › ढोरवाडी तलावाच्या भिंतीची दुरवस्था 

ढोरवाडी तलावाच्या भिंतीची दुरवस्था 

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 26 2018 12:46AMवडवणी : प्रतिनिधी 

तालुक्यातील ढोरवाडी येथील पाझर तलावाची अतिशय दुरवस्था झाली आहे. तलावाच्या भिंतीवर मोठ मोठी झाडे वाढलेली आहेत. सांडव्यालाही ठिकठिकाणी मोठे भगदाड पडले असून त्यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. संबधित पाटबंधारे विभागाचे मात्र या तलावाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.  

वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथे मागील चाळीस वर्षांपूर्वी हा तलाव बांधण्यात आलेला आहे. या  पाझर तलावातून केसापुरी, ढोरवाडी, काळेवस्ती या गावांना पाणीपुरवठा केला जातो,  मात्र तलावाचे बांधकाम झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने या तलावाकडे लक्ष दिलेच नाही. तलावाच्या सांडव्याला मोठं भगदाड पडलेले असल्याने पाणीसाठा होताच यातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात  अपव्यय होत आहे. त्यामुळे तलाव थोड्याच दिवसात  कोरडाठाक पडत आहे. परिणामी वरील गावच्या पाणीपुरवठ्याचाही प्रश्न निर्माण झाला  आहे. तलावाच्या भिंतीवरही मोठमोठी झाडे झुडपे वाढलेली असल्याने तसेच सांडव्याला मोठे भगदाडा पडल्याने  या तलावाला धोका निर्माण झालेला आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या तलावाकडे संबधित पाटबंधारे विभागाचे  दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. संबधित पाटबंधारे विभागाने तत्काळ या तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी मागणी गावकरयांनी केली आहे. 

नेमका तलाव कोणाचा? 

ढोरवाडी येथील या तलावाबाबत चौकशी केली असता पाटबंधारे विभाग, जि. प. चा लघुपाटबंधारे विभागासह सर्वच पाटबंधारे विभागातील आधिकारी हा तलाव आमच्या अखत्यारीत नाही असे सांगतात. त्यामुळे हा तलाव नेमका  कोणत्या विभागाच्या अखत्यारीत आहे. या तलावाचा वाली कोण?  का हा तलाव बेवारस आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. या तलावाकडे वेळीच लक्ष दिले नाही धोका उद्भवण्याची शक्यता नकारता येत नाही. 

ढोरवाडी तलावाच्या भिंतीवर झाडे-झुडपे वाढली असून सांडव्याला ही भगदाड पडले आहे. त्यामुळे हा तलाव फुटून ढोरवाडी, केसापुरी, परभणी आदी गावच्या शेतीचे नुकसान होऊन गावांनाही धोका निर्माण होऊ शकतो. तेलगाव, धारूर व बीड येथील पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता हा तलाव आमचेकडे नाही असे म्हणत जबाबदारी झटकत आहेत असे ढोरवाडी येथील ग्रामस्थांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. पाऊस अधिक झाला तर तलाव फु टण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्‍त केली आहे.