Fri, Jul 19, 2019 14:25होमपेज › Marathwada › मराठा आरक्षणावर धनंजय मुंडे यांचा विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव

मराठा आरक्षणावर धनंजय मुंडे यांचा विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव

Published On: Jul 18 2018 6:15PM | Last Updated: Jul 18 2018 6:15PMपरळी वैजनाथ : रविंद्र जोशी  

मराठा समाजाच्या मागण्यासाठी सरकारविरोधात परळीत मराठा समाजाच्यावतीने ठोकमोर्चा काढण्यात आला होता.  या मोर्चात मराठा बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला होता. हा मोर्चा दुपारी एकच्या सुमारास तहसील कार्यालयावर धडकला. त्याचवेळी या मोर्चाचे पडसाद नागपूर येथे सुरू असलेल्या  पावसाळी अधिवेशनात उमटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव ठेवला, यावर १५ मिनीटे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 

मराठा आरक्षणासाठी गेली ४ वर्षे मराठा तरुणांनी संयम दाखवला आहे. तर, या मागण्यासंदर्भात संपूर्ण राज्यभर संयमाने मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला. आत्ता त्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका - त्यांचा अंत बघू नका. जर का आता या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर तरुणांना दोष देवू नका असा इशाराच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी सरकारला दिला.

नियम २८९ अन्वये मराठा आरक्षणावर धनंजय मुंडे यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडताना सरकारने मराठा समाजाची कशी फसवणूक केली आहे आणि कशाप्रकारे फसवत आहे याची माहिती दिली. मराठा समाजाने राज्यात आत्तापर्यंत लाखोंच्या संख्येने ५७ मोर्चे काढले आहेत. आज परळी येथे मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून आत्ता २३ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी आंदोलन केले जाणार आहे असेही धनंजय मुंडे यांनी  यावेळी स्पष्ट केले.

मराठा समाजाचे राज्यात 57 मुक मोर्चे निघूनही सरकारने याबाबत अजूनही निर्णय घेतला नाही. आता हे मोर्चे तालुक्या तालुक्यात निघत आहेत. मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चे निघत आहेत. समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका , मराठा आरक्षण निर्णय तातडीने घ्या अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. या प्रश्नावर आमदार सुनील तटकरे, आमदार भाई जगताप, आमदार संजय दत्त, आमदार नरेंद्र पाटील यांनी मत व्यक्त केले.  आरक्षण न देणा-या सरकारचा विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणा देत धिक्कार केला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज 15 मिनिटे तहकूब करण्यात आले. या विषयावर चर्चेसाठी वेळ देण्याचे आश्वासन सभापती यांनी दिले.