Mon, May 20, 2019 22:30होमपेज › Marathwada › पोर्टलवरून देवाळा गाव गायब

पोर्टलवरून देवाळा गाव गायब

Published On: Jul 27 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 1:14AMहिंगोली : प्रतिनिधी

पीकविमा भरण्यासाठी चार दिवस शिल्‍लक राहिले असताना सर्वत्र पीकविमा भरण्याची लगबग सुरू आहे, परंतु औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके महसूल मंडळात येणार्‍या देवाळा गावची नोंद पीकविम्याच्या पोर्टलवर होत नसल्याने या गावातील जवळपास एक हजारपेक्षा जास्त शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी सध्या शेतकर्‍यांकडून पीकविमा ऑनलाइन भरून घेतला जात आहे, परंतु वेबसाईट चालत नसल्यामुळे शेतकर्‍यांना तासन्तास महा ई सेवा केंद्रावर ताटकळत बसावे लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही बोंब कायम असतानाच औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके महसूल मंडळात येणार्‍या देवाळा हे गाव पीकविम्याच्या ऑनलाइन पोर्टलवर येत नसल्यामुळे शेतकर्‍यांची अडचण झाली आहे.  

महा ई सेवा केद्रावर मागील आठवडाभरापासून या गावातील शेतकरी पीकविमा भरण्यासाठी चकरा मारीत आहेत, परंतु गाव पोर्टलवर येत नसल्यामुळे ऑनलाइन पीकविमा भरण्यासाठी अडचण होत आहे. शेतकर्‍यांची मानसिकता पीकविमा भरण्याची असली तरी गावच पोर्टलवरून गाव गायब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. 31 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे, परंतु अद्यापही पोर्टलवर देवाळा गाव दाखविले जात नसल्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

शेतकरी ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल, तूर, कापूस, उडीद आदी पिकांच्या पीकविमा भरत आहेत. पीकविमा भरण्यासाठी शेतकरी बँकेच्या चकरा मारत आहेत. बेवसाईट चालत नसल्याने बँकाही हतबल झाल्या आहेत. काही शेतकरी बाहेरील नेट कॅफेवर पीकविमा भरण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी त्या ठिकाणीही तिच परिस्थिती असल्याने शेतकरी  चिंतेत आहे.

राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकर्‍यांचा पीकविमा ऑनलाइन भरून घेतल्या जात आहे, परंतु वेबसाईट चालत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. बाहरेच्या नेट कॅफेवरून शेतकरी ऑनलाइन पीकविमा रात्री-अपरात्री भरत आहेत, परंतु कोठेही पीकविमा भरण्याची वेबसाईट चालत नाही. पीक विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांना सातबारा,  बँक पासबुक द्यावे लागत आहे. हे जमा करण्यासाठी शेतकर्‍यांना 200 ते 250 रुपये खर्च येत आहे.त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी अनेक शेतकर्‍यांनी केली होती. त्यानंतर 31 जुलै ही तारीख शासनाने वाढवून दिली आहे, पण वेबसाईट चालत नसल्याने रोष व्यक्‍त होत आहे.

औंढा नाग. तालुक्यातील देवाळा येथील शेतकरी पीकविमा भरण्यासाठी महा ई सेवा केंद्रावर येत आहेत. परंतु गावाचा समावेश पोर्टलवर झाला नसल्याने शेतकर्‍यांची अडचण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने ही चूक सुधारून देवाळा गावाचा समावेश ई पोर्टलवर करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य मनीष आखरे यांनी केली आहे.