Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Marathwada › पुरुषोत्तमपुरी विकासापासून वंचित

पुरुषोत्तमपुरी विकासापासून वंचित

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:19AMकिट्टी आडगाव : प्रतिनिधी

अधिक मासात महत्त्व असलेल्या पुरुषोत्तमाचे मंदिर माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीकाठी आहे. यावर्षी अधिक मास येत आहे. या काळात देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, परंतु येणार्‍या भाविकांना पुरेशा सुविधा नसल्याने अडचण होते. या ठिकाणी सुविधांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी होत आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठी पुरुषोत्तमपुरी ही चार हजार लोकसंख्येचे गाव. येथे नदीकाठापासून अलीकडे शंभर मीटर अंतरावर तेराव्या शतकातील राजा रामदेवराय यांच्या काळात भगवान पुरुषोत्तमाचे हेमाडपंती मंदिर उभारण्यात आलेले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून आतील गाभार्‍यात काळ्या पाषाणात भगवान पुरुषोत्तमाची हाती शंख-चक्र-गदा-पद्म धारण केलेली तीन फूट उंचीची मूर्ती आहे.

अधिक मासात महत्त्व

‘धोंडे महात्म्य’या पवित्र ग्रंथात उल्लेखलेल्या बारा महिन्यांना बारा भगवंत स्वामी आहेत, मात्र सर्वांचा मिळून बनलेल्या अधिक मासाचे स्वामित्व कोणीच स्वीकारत नसल्याने ते पुरुषोत्तमाने स्वीकारले. त्यामुळे दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास (धोंड्याचा महिना) पुरुषोत्तम दर्शनास महत्त्व आहे. देशातील विविध भागातून येणारे लाखो भक्त चक्रतीर्थात स्नान करूनच पुरुषोत्तमाचे दर्शन घेतात. दर तीन वर्षांनी येणार्‍या अधिक मासात  हजारो भाविक दर्शन घेतात.

प्रतीक्षा तीर्थक्षेत्र दर्जाची 

जिल्ह्यात पुरुषोत्तमपुरी येथे पुरातन मंदिर असताना प्रशासनाच्या व राजकीय उदासिनतेमुळे या गावास अद्यापपर्यंत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळू शकला नाही. त्यामुळे हे गाव व परिसर विकासापासून वंचित आहे. या गावास जाण्याचा मार्गही एकेरी व बिकट आहे. रस्त्याची पूर्णतः दुरवस्था असल्याने अधिक मासात संपूर्ण बारा कि.मी. वाहतुकीची मोठी कोंडी होते. 

केंद्रेकरांनी तयार केला होता विकास आराखडा 

सन 2012 मधील अधिकमासात तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी या गावास भेट दिली. या मंदिरची झालेली पडझड-दुरवस्था व मंदिराचे महत्त्व जाणून घेऊन त्यांनी मंदिरासह या गावचा सुंदर असा विकास आराखडा तयार केला होता.