Fri, Jul 19, 2019 05:18होमपेज › Marathwada › नांदेडमधील ४० गावांची तेलंगणात जाण्याची मागणी

नांदेडमधील ४० गावांची तेलंगणात जाण्याची मागणी

Published On: May 22 2018 7:16PM | Last Updated: May 22 2018 7:16PMनांदेड : प्रतिनिधी

महाराष्ट्रात कायम शेतकर्‍यांसह सामान्यांना शासनाच्या योजनांचा भरघोस लाभ इतर राज्यांप्रमाणे मिळत नाही. शेजारच्या तेलंगणा या राज्यात शेतकरी व सर्वसामान्य माणूस सरकारच्या योजनांमुळे सुखी आहे. त्यामुळे तेलंगणाच्या सीमेवर लागून असलेल्या धर्माबाद तालुक्यातील चाळीस गावांचा समावेश तेलंगणात करावा, अशी मागणी तेथील सरपंचांनी केली आहे. त्यामुळे एका नव्या वादा तोंड फुटले आहे.

नांदेड जिल्ह्याला कर्नाटक व पूर्वीचा आंध्रप्रदेश तर आताच्या तेलंगणा या राज्याची सीमा आहे. जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, भोकर व किनवट तालुक्यांच्या सीमारेषा तेलंगणाला लागून आहेत. रोटी-बेटी व्यवहार सुद्धा तेलंगणा राज्यातील गावात व सीमालगतच्या गावांमध्ये होत असतो. व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा ही गावे एकमेकांना जोडलेली आहे. नातीगोतीही तेलंगणात आहेत. तसेच चार ते पाच तालुक्यातील बहुतांशी लोकांना तेलगू बोलता येते. तसेच भौगोलिकताही सारखी आहे. 

या भागातील लोकांचे मुळ दुखने हे आहे, की तेलंगणात शेतकरी असो किंवा सामान्य माणूस त्यांना तेथील सरकार भरभरून देते. त्या तुलनेत राज्यात तुटपुंजे मिळते. अगदी काही किलोमीटरवरील शेतकरी व सर्वसामान्य माणूस आनंदी आयुष्य जगत असताना, आमच्या नशिबी सरकारचा अन्याय का? अशी भावना या भागातील लोकांची अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे या भागातील चाळीस सरपंच एकत्र आले आहे. 

या सर्वांची मागणी आहे. आमच्या गावांचा सुद्धा कोणत्याही अटीविना तेलंगणात समावेश करावा. यासाठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे, की तेलंगणामधील शेतकर्‍यांना प्रत्येक योजनेवर ९५ टक्के सवलत मिळते. महाराष्ट्रात टक्केवारीचे प्रमाण कमी आहे. तेथील शेतकर्‍यांचा माल सरकार शेतावर जाऊन उचलते, येथे मात्र नाफेडवर नेऊन टाकावा लागतो. तिथे पशुपालक शेतकर्‍यांना २० शेळ्या दिल्या जातात. येथे संख्या कमी आहे. तेथील रस्ते उत्‍तम दर्जाचे आहेत. आम्ही खेड्यातून रस्ता शोधतो. खरीप व रब्बी हंगामासाठी तेथील सरकार चार -चार हजार रुपये प्रमाणे आठ हजार रुपये देते. येथे मदत दिली जात नाही. प्रसूती होणार्‍या महिलेस ११ हजार रुपये दिले जातात. मात्र येथे सातशे रुपये, निराधारांना बाराशे रुपये मिळतात. आपल्याकडे आठशे रुपये, तिथे चौविस तास शेतकर्‍यांना विज मिळते, येथे भारनियमान असे अनेक मुद्दे आहेत. ते सांगता येतील असे सरपंच बाबूराव कदम यांनी सांगितले. त्यामुळे सर्व सरपंचांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags :maharashtra, nanded, telangana, dharmabad