Sun, Jul 21, 2019 05:34होमपेज › Marathwada › खत विक्रेत्यांना 35 ई-पॉस यंत्राचे वितरण

खत विक्रेत्यांना 35 ई-पॉस यंत्राचे वितरण

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 10:49PMपाथरी : प्रतिनिधी

खतविक्री सुरू झाल्याने तालुक्यातील मान्यताप्राप्त परवानाधारक 50 कृषी केंद्रांपैकी 35 दुकानदारांना ई-पॉस यंत्रांचे वितरण करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी शेख यांनी दिली आहे.कृषी सेवा केंद्रातून आधारकार्डा-शिवाय शेतकर्‍यांना रासायनिक खतांची विक्री केली जाणार नसल्यामुळे शेतकर्‍यांना खत खरेदी करताना आधारकार्ड बंधनकारक असून बायोमॅट्रिक पद्धतीने ई-पॉस यंत्रावर अंगठ्याचा ठसा दिल्यानंतरच शेतकर्‍यांना खत खरेदी करता येणार आहे. 

केंद्र सरकारच्या थेट लाभ हस्तांतर योजनेअंतर्गत खतांची विक्री बायोमॅट्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे. खतांसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानातील काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने ही योजना आखली असून त्याची अंमलबजावणी 1 वर्षापासून सुरू आहे. मान्सूनचे वेळेवर आगमन होऊन बर्‍यापैकी पाऊस होणार असल्याने 4 वर्षांपासून दुष्काळाच्या संकटात सापडलेला शेतकरी यावर्षीच्या आशेवर खरिपाची तयारी करीत असून बी-बियाणांसोबतच खतांचे नियोजन करत आहे. प्रत्येक शेतकर्‍यांना खत मिळावा यासाठी यावर्षीही गतवर्षीप्रमाणेच बायोमॅट्रिक पद्धतीने खतांच्या विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाची तयारी सुरू असून बायोमॅट्रिक पद्धतीने खत विक्रीसाठी तालुक्यातील 37 हजारांवर शेतकर्‍यांसाठी पाथरीसह ग्रामीण भागातील 50 कृषी सेवा केंद्रचालकांपैकी मागणी करण्यात आलेल्या 35 केंद्रचालकांना ई-पॉस यंत्राचे वाटप पं. स. कडून झाले. केंद्र सरकारच्या थेट लाभ हस्तांतर योजनेअंतर्गत खतांच्या विक्रीसाठी कृषी सेवा केंद्रांना ई-पॉस यंत्र देऊन बायोमॅट्रिक पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. विक्री केंद्रांवर ग्राहकांचे आधार क्रमांक यंत्रावर नोंदवून बिल तयार होईल. त्यानंतरच खतांचे अनुदान कंपनी खात्यात जमा होईल.

खत विक्रीचा हिशेब राहणार : सध्या अस्तित्त्वात असलेल्या व्यवस्थेत किती शेतकर्‍यांनी खते वापरली. किती खते इतर कंपन्यांनी विकली, याचा हिशोब ठेवला जात नव्हता. तसेच शेतकर्‍यांना प्रत्यक्ष खताची विक्री होण्याअगोदरच सरकारी अनुदानाचा पैसा कंपन्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे निदर्शनास आल्याने खत विक्रीच्या या पद्धतीत बदल करण्यात आला आहे.


35 कृषी सेवा केंद्रांना मशीनचे वाटप : पाथरी तालुक्यात 50 पेक्षा जास्त कृषी सेवा केंद्र आहेत. या केंद्रांना या नव्या योजनेसाठी कृषी विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत नोंदणी केलेल्या शहारासह ग्रामीण भागातील 35 केंद्रांना ई-पॉस मशीनचे वाटप केले आहे. तसेच या पद्धतीत खतांची विक्री कशी करायची याबाबत पंचायत समिती स्तरावर केंद्रचालकांना माहिती देण्यात आली आहे. अद्यापही बर्‍याच केंद्रांना मशीन दिलेले नाही. त्यामुळे एक जूनपर्यंत केंद्रांची नोंदणी करण्याबरोबरच त्यांना माहिती देण्यात येणार आहे.