Wed, Mar 27, 2019 04:09होमपेज › Marathwada › रिक्षातच केली महिलेची प्रसूती

रिक्षातच केली महिलेची प्रसूती

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 1:42AMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

अ‍ॅपे रिक्षातून दीड तासाचा रुग्णालयापर्यंतचा खडतर प्रवास. त्यातच प्रसूतीच्या असह्य झालेल्या वेदना. अशा संकटाचा सामना करीत रुग्ण महिला अंबाजोगाईच्या स्वा. रा. ती. रुग्णालयाच्या परिसरात पोहचताच वेदना असह्य होत असल्याने तिच्या विव्हळण्याचा आवाज महिला डॉक्टरांच्या कानावर पडला. डॉक्टरांनीही कसलीही तमा न बाळगता थेट रिक्षाकडे धाव घेतली. अडचणीत सापडलेल्या त्या महिलेची शनिवारी रात्री प्रसूती रिक्षातच करून तिला दिलासा दिला. 

होळ येथील एक महिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने प्रसूतीसाठी होळ येथून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाकडे शनिवारी अ‍ॅपे रिक्षातून निघाली. रिक्षा होळ येथून 11.30 वाजता निघाला होता. रस्त्यावरील खड्डे, राज्यरस्त्याचे सुरू असलेले काम अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत दीड तासानंतर 15 कि.मी. चे अंतर पार करत रिक्षा रुग्णालय परिसरात दाखल झाला. रिक्षातील रुग्ण महिला प्रसूतीच्या असह्य वेदनांनी विव्हळत होती. तिला रुग्ण कक्षात घेऊन जाणेही नातेवाइकांना कठीण झाले. असह्य वेदना होऊ लागल्याने ती जोर-जोरात विव्हळत होती. तिचा आवाज स्त्रीरोग विभागातील निवासी डॉक्टर मिताली गोलेच्छा यांनी ऐकला व त्यांनी तत्काळ रिक्षाकडे धाव घेतली.

रिक्षात असलेल्या महिलेची स्थिती पाहून त्यांना त्या महिलेच्या प्रसूतीबाबतची पूर्ण जाणीव झाली. प्रसंगावधान ओळखून त्यांनी आजूबाजूच्या महिला व परिचारिकांना बोलावून त्या महिलेची प्रसूती रिक्षातच केली व त्या महिलेला पुन्हा महिला रुग्णकक्षात दाखल केले. महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. स्वा.रा.ती. रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखविलेल्या या तत्पर सेवेबद्दल स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी डॉ. मिताली गोलेच्छा यांचे कौतुक केले.