Thu, Sep 20, 2018 16:54



होमपेज › Marathwada › कर्जमाफीस १ मेची मुदत

कर्जमाफीस १ मेची मुदत

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 11:28PM



परभणी : नरहरी चौधरी 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत यापूर्वीच्या कालावधीत कर्जमाफीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांसाठी ऑनलाइन अर्जाकरिता आता शासनाने 1 मे रोजीची वाढीव मुदतीची डेडलाईन दिली आहे. यामुळे वंचित शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे सुकर होणार असल्याचे दिसते. 

राज्यात 2014-15 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचल्याने त्यांचे दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत 28 जून 2017 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यात 24 जुलै ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीत शेतकर्‍यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र अनेक शेतकर्‍यांना तांत्रिक कारणामुळे विहित मुदतीत शासनाकडे ऑनलाइन अर्ज सादर करता आले नाहीत. ही परिस्थिती विचारात घेता योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक संधी शासनाने शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे. परभणी जिल्ह्यात एकूण 3 लाख 47 हजार शेतकरी आहेत.

यापैकी जिल्ह्यातील जवळपास 3 लाख शेतकर्‍यांनी ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. उर्वरितमध्ये काही जणांनी ऑफलाइन अर्ज भरले आहेत. शासनाकडून या अर्जासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली गेली. 31 मार्च नंतर 14 एप्रिलची मुदत दिली होती. पण याही कालावधीत अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासुन वंचीत राहिल्याची बाब उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी परत अर्ज ऑनलाइन दाखल करण्यासाठी आता 1 मे रोजीची डेडलाईन पुन्हा दिली असल्याची माहिती राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव तथा सहनिबंधक रमेश शिंगोटे यांनी राज्यपालांच्या आदेशावरून शासन निर्णयाद्वारे दिली आहे. 

Tags : Debt waiver 1st May deadline