Sun, Nov 18, 2018 03:54



होमपेज › Marathwada › उस्‍मानाबादमध्ये बूट चोरण्यावरून वाद; नवरीशिवाय परतलं वर्‍हाड

उस्‍मानाबादमध्ये बूट चोरण्यावरून वाद; नवरीशिवाय परतलं वर्‍हाड

Published On: May 07 2018 7:58AM | Last Updated: May 07 2018 7:58AM



केज : दीपक नाईकवाडे

तालुक्यातील कुंबेफळ येथे रविवारी दुपारी तुळजापुर येथील मुस्लिम समाजाच्या युवकाचा विवाह पार पडला. त्यानंतर नवरदेवाचे बुट लहान मुलांनी लपविल्याच्या कारणावरुन नवर्‍या मुलाने सासरच्या मंडळींना मारहाण केली. त्यामुळे झालेले लग्न वधुपित्याने मोडल्याने नव वधुला न घेताच वर्‍हाडास परत जावे लागले

कुंबेफळ येथील मुस्लिम समाजाच्या मुलीचा विवाह तुळजापुर येथील मुलासोबत रविवारी होता. यावेळी लहान मुलांनी लग्नातील परंपरेनुसार लहान मुलांनी नवरदेवाचा बुट लपवून ठेवला. नवरदेवास आपला बुट लपविल्याचा राग आल्याने नवरदेवाने हा राग सासरा व मेव्हण्यावर काढत त्यांना मारहाण केली. नवरदेवाने वधुपित्यास मारहाण केल्यानंतर वधु मंडळी व वर मंडळींच्या दोन्ही गटात मारहाण झाली. यात नवरदेवासह इतर चारजण जखमी झाले. सदर घटनेनंतर वधु पित्याने झालेले लग्न मोडल्याने नवरदेवास नवरी न घेताच माघारी रिकाम्या हाताने परत जावे लागले. 

नवरदेवाने पोलिस ठाण्यात घेतली धाव

नवरदेवाने बुट लपविण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीमुळे लग्न मंडपात दुपारी एक ते सायंकाळी पाच पर्यंत दोन्ही गटात वाद चालू होता. तर नवरदेवाने पोलिस ठाण्यात धाव घेतली होती, अशी माहिती कुंबेफळ येथील ग्रामस्थांनी दिली. या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले