Sun, Jun 16, 2019 13:08
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › श्रेयवादावरून नवीन समीकरणांची नांदी 

श्रेयवादावरून नवीन समीकरणांची नांदी 

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 12:47AMपाटोदा : प्रतिनिधी 

या  मतदारसंघातील  दोन दिग्गज नेते माजी राज्यमंत्री आ. सुरेश धस  व  आ. भीमराव धोंडे यांच्यात सध्या काही विकासकामांच्या श्रेयवादावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मंजूर झालेल्या कामांसाठी आपणच पाठपुरावा केला असल्याचा दावा हे दोन्ही नेते करत आहेत. आता एकाच पक्षात असूनही या दोन्ही आमदारांमधील वाद हा भविष्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणारा असून या वादाचा विरोधकांसह पक्षातीलही काही स्थानिक नेत्यांना अप्रत्यक्षपणे फायदाच होणार आहे. सध्या मतदारसंघात व सोशल मीडियावर देखील या चर्चेला उधाण आले आहे.मागील काही काळात या मतदारसंघात घडलेल्या वेगवान घडामोडींनी राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. 

माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची भाजपशी जवळीक ही आ. भीमराव धोंडेंना फारशी रूचणारी नव्हती. मागे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधील यशाच्या श्रेयवादावरूनच या दोन्ही नेत्यांमध्ये पडलेली वादाची ठिणगी ही भविष्यातील अंतर्गत कलहाची दिशा स्पष्ट करणारी होती. त्यातच महत्वाकांक्षी असलेल्या धस यांनी अल्पवधीतच भाजपची विधान परिषदेची उमेदवारीही मिळविली व मोठ्या फरकाने विजय मिळविला. धस यांच्या विजयानंतर आ. धोंडे यांच्या विधानसभेच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र दिसत होते, मात्र आता पुन्हा एकदा मतदारसंघातील रस्ता कामांच्या श्रेयवादावरून दोघामध्ये पुन्हा एकदा जाहीररित्या वाद पेटला आहे . एकाच पक्षातील व एकाच मतदारसंघातील या दोन नेत्यांच्या वादाचा मात्र येणार्‍या काळात विरोधकांसह पक्षातील ही काही नेत्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची गणिते सांभाळताना पक्षश्रेष्ठीचाही कस लागणार आहे कारण या दोन्हीआमदारांमधील टोकाचे मतभेद पाहता विधानसभेच्या वेळी एकमेकांना प्रत्यक्ष सहकार्य होईलच असे म्हणने सध्या तरी धाडसाचे ठरणार आहे.

आगामी काळात राजकीय बदल अपेक्षित आहेत. दोन्ही आमदार एकाच पक्षात आहेत. त्यामुळे आ. धोंडे याची कोंडी होईल अशी चर्चा आष्टी मतदार संघात होत आहे. विशेष म्हणजे, आ. सुरेश धस यांचे राजकीय वजन भाजपमध्ये अपेक्षेपेक्षा गतीने वाढत आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेतला तर आ. धोंडे यांच्यासाठी पुढील काळ बकट असू शकतो.

भात्यात बाण वाढले

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मागे धस यांच्या आष्टी येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात म्हटले होते की, एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत. हे जरी सत्य असले तरीही एका धनुष्याच्या भात्यात मात्र अनेक बाण बसू शकतात व त्या धनुष्याचा प्रभाव मात्र मुडेंच्या हाती आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आता सर्व गोष्टी तर घडत आहेत, मात्र आता भात्यातील बाणांची मर्यादा व यामुळे घडणार्‍या घडामोडींवर सतत लक्ष ठेवून सर्वांनाच सांभाळून घेऊन योग्य वेळी योग्य बाणाचाच वापर करावा लागेल.  

धस-दरेकरांचे नाते महत्त्वाचे

आ. धोंडे व आ. धस यांच्यात तर वाद सुरूच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघात गोल्हार गट सक्रिय झाला. जि. प . अध्यक्षा सविता गोल्हार व विजय गोल्हार यांची प्रत्येक कार्यक्रमांना हजेरी ही पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी असल्याची चर्चा आहे. तर जयदत्त धस यांचे दरेकरांशी झालेले नाते ही या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहे.