Mon, Jul 22, 2019 02:36होमपेज › Marathwada › गंगाखेड-धारखेड पूल निर्मितीचे नाट्यमय राजकारण

गंगाखेड-धारखेड पूल निर्मितीचे नाट्यमय राजकारण

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 10:55PMगंगाखेड : प्रतिनिधी

गोदाकाठच्या 21 गावांचा गंगाखेड शहराशी थेट संपर्क व्हावा याकरिता गोदापात्रात पूल निर्मितीसाठी आपणच निधी मंजूर करून घेतल्याचे नाट्यमय राजकारण रंगले आहे. प्रशासकीय स्तरावरून याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नसल्याने गोदापात्रातील पुलाचे राजकरण होताना दिसत आहे.

गोदाकाठावरील 21 गावांतील नागरिकांना गंगाखेडात  येण्यासाठी गोदावरीचे पात्र ओलाडूंन यावे लागते. कमी अंतर होत असल्याने धारखेड, मुळी, नागठणा, धसाडी, सुनेगाव, सायळा, अंगलगाव, माळसोन्ना, खरबडा, दामपुरी, देवठाणा, देऊळगाव, पोरवड, वझूर, रेणकापूर, बामणी, लोहगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी व विद्यार्थ्यांना धारखेडजवळील गोदापात्रातील मार्ग जवळचा असल्याने याच मार्गाचा वापर अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण दर पावसाळ्यात गोदावरीस येणार्‍या पुरामुळे हा मार्ग बंद होतो.

या पात्रात पाणी असेपर्यत 21 गावांना वळसा घालून परभणी राज्यमार्गे गंगाखेडमध्ये यावे लागते. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी शहरालगत गंगाखेड-धारखेड गोदापात्रात पुलाच्या निर्मितीची मागणी अनेक वर्षांची आहे. माजी आ.सीताराम घनदाट यांनी याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच दाखल केला होता. पण निधी व प्रशासकीय मान्यताअभावी लालफितील अडकला होता. तर आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांनीही एक वर्षापासून मागणी करत  सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याकडे केली असून सातत्याने पाठपुरावा होत आहे. नागपूर अधिवेशनात या पुलाच्या निर्मितीसाठी निधी मंजूर करून घेतल्याचे आ.केंद्रे समर्थकांनी जाहीर केले. तर उद्योगपती तथा रासपाचे डॉ.रत्नाकर गुट्टे यांनीही याच पुलाच्या निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव दाखल करत निधी मंजूर करून अवघ्या दोन महिन्यांत प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार असल्याची घोषणा केली.शहरालगत गोदापात्रात पुलाची निर्मितीचा प्रश्न गोदाकाठच्या 21 गावांचा असून पुलाची निर्मिती व्हावी याचे राजकारण होऊ नये अशा भावना व्यक्‍त होत आहे.

गडकरींचा हिरवा कंदील

मागील महिन्यात भाजपचे रवी जोशी, जिल्हा सरचिटणीस शशिकांत देशपांडे, श्रीपाद कोद्रीकर, घनदाट मित्रमंडळाचे गौतम रोहिणकर, संतोष टोले यांनी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेत गोदावरी संवर्धन, गोदाकाठ सुशोभीकरण, गोदापात्रात धारखेड पुलासह बंधार्‍याचा प्रस्ताव दाखल करत निधीची मागणी केली. सदरील प्रस्ताव व आराखड्याची मागणीबाबत गडकरी यांनी केंद्रीय अभियंता, अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत निधी देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली.