Mon, May 20, 2019 20:37होमपेज › Marathwada › डाकसेवकांच्या संपामुळे ग्रामीण टपालसेवा विस्कळीत

डाकसेवकांच्या संपामुळे ग्रामीण टपालसेवा विस्कळीत

Published On: May 28 2018 1:52AM | Last Updated: May 27 2018 10:51PMजिंतूर : प्रतिनिधी

विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यातील 250 डाकसेवक बेमुदत संपावर गेले आहेत. डाकसेवकांचा 14 मेपासून संप सुरू असून या संपामुळे टपालसेवा विस्कळीत झाली आहे.

कमलेशचंद समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागण्यांसाठी डाकसेवक संपावर गेले आहेत. त्यामुळे टपालसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. टपाल वितरित करणे, रजिस्ट्री करणे, मनिऑर्डर, सुकन्या समृध्दी योजना, नवीन खाते उघडणे आदी कामे ठप्प झाली आहेत. परभणी जिल्ह्यातील 250 डाकसेवक बेमुदत संपावर आहेत. डाकसेवकांची सेवानिवृत्तीजवळ आली तरी त्यांना फक्त 7 ते 8 हजार रुपये मानधन मिळत आहे. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांना दिवसभर काम करावे लागते.  गाव, डोंगर, तांडा, खोरे, वस्ती या ठिकाणी पावसात, उन्हात, वादळ-वार्‍यात आपला जीव मुठीत धरून टपालसेवा पुरवावी लागते. 

तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा कसा हाकावा? असा प्रश्न त्यांना पडतो.  काही डाकसेवकांना 30 ते 35 वर्षे सेवा झालेली असताना फक्त 9 ते10 हजार रुपये मानधन आहे. वेतनवाढ करावी व सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी डाकसेवक करीत आहेत. आपल्या मागण्यांचे निवेदन डाकसेवकांनी 14 मे रोजी लोकप्रतिनिधींकडे दिले असून प्रलंबित मागण्यांसाठी डाकसेवक बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. 

सरकारने आश्‍वासन न पाळल्याने आंदोलन

भारतीय डाक मजूर संघ या संघटनेने हा संप पुकारला आहे. या अगोदर अनेकवेळा केंद्र शासनाने आश्‍वासन दिले होते, परंतु 7 वा वेतन आयोग लागू केला नाही. 
त्यामुळे संपूर्ण देशातील ग्रामीण डाकसेवक 14 मेपासून बेमुदत संपावर आहेत, अशी माहिती भारतीय डाक  मंजूर संघाचे महाराष्ट सचिव बाळासाहेब देशमुख यांनी दिली.