बीड : दिनेश गुळवे
गतवर्षी कर्जमाफीच्या घोळाने पीक कर्ज 25 टक्केही वाटप होऊ शकले नव्हते, यंदाही वाटपाची कासव गती असल्याने तब्बल दोन हजार कोटींवर पीक कर्ज वेळेत वाटप करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. एकीकडे वेळेत पीक कर्ज वाटपाचा तगादा असला तरी दुसरीकडे बँकांमधील अधिकार्यांची कमतरता, बँक अधिकार्यांवर होणारा कामाचा ताण यामुळे वाटपाची गती जेमतेम आहे. तेव्हा, यंदातरी पूर्ण पीक कर्ज वाटप होणार का? याबाबत साशंकता आहे.
गतवर्षीही जिल्ह्यात दोन हजार कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ठ होते, मात्र त्याच दरम्यान सरकारकडून कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. ही कर्जमाफी सुरुवातीस सरसकट करण्यात आली, नंतर त्यात निकष टाकून दीड लाखापर्यंतचा निर्णय झाला. याच दरम्यान शेतकर्यांना दहा हजार रुपये कर्ज देण्याचाही निर्णय झाला. या सर्व घोळात कर्जमाफ होईल, या आशेने नवीन कर्जवाटप बंद झाले. परिणामी दोन हजार कोटींपैकी 25 टक्केही कर्जवाटप होऊ शकले नव्हते. यावर्षी जवळपास अर्ध्या शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली आहे. काही शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर यंदातरी पूर्ण पीक कर्ज वाटप होईल का? याची शंका आहे. यावर्षी खरीप हंगामात दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील विविध बँकांना देण्यात आले होते. खरीप हंगाम व पाऊस पडू लागल्याने शेतकर्यांना पेरणीसाठी पैशांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बँकांनी 30 जूनपर्यंत पीक कर्ज वाटपाच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. असे असले तरी बँक अधिकार्यांनाही मर्यादा येत आहे. एकाच वेळी बँकांमध्ये शेतकरी मोठी गर्दी करीत आहेत. त्यातच काही बँकांमध्ये कर्मचार्यांची कमतरता आहे. या सर्वांचा परिणाम पीक कर्ज वाटपावर होत आहे.
12 हजार 570 शेतकर्यांना 101 कोटी 64 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तेव्हा 30 जून पर्यंत पीक कर्ज वाटप करण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.