Tue, Jul 16, 2019 00:19होमपेज › Marathwada › बीड : किरकोळ वादातून तरुणाला विष पाजून मारले

बीड : किरकोळ वादातून तरुणाला विष पाजून मारले

Published On: Mar 02 2018 3:14PM | Last Updated: Mar 02 2018 3:16PM बीड :  प्रतिनिधी 

शौचालयात कचरा टाकल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरूणाचा विषारी औषध पाजून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाळासाहेब रघुनाथ राठोड (वय ३२) असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शौचालयात कचरा का टाकला याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब हा गेला असता शेजारच्या पाच जणांनी त्याला बेदम मारहाण करत विषारी औषध पाजले. शुक्रवारी सकाळी गेवराई तालुक्यातील केकत पांगरी जवळच्या लक्ष्मण तांड्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी पाचही आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीत एका महिलेचाही समावेश आहे.

याप्रकरणी मनीषा बाळासाहेब राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाजूच्या शौचालयात शेजारी रहाणाऱ्या वंदना प्रकाश राठोड या महिलेने कचरा टाकला. ही बाब मनीषा यांनी पती बाळासाहेब राठोड यांना सांगितली. याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब राठोड वंदनाचा पती प्रकाश राठोड याच्याकडे गेले असता दोघात शाब्दिक बाचाबाची झाली.

बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. प्रकाश, वंदना आणि तिथे आलेल्या अविनाश राम राठोड अंकुश लक्ष्मण राठोड, राम लक्ष्मण राठोड या सर्वांनी मिळून बाळासाहेब आणि मनीषा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनी बाळासाहेब यास खाली पाडले. सर्वांनी त्याला पकडून ठेवले आणि प्रकाशने घरातून विषारी औषधाची बाटली आणली. त्यातील औषध बळजबरीने बाळासाहेब यांना पाजले. यावेळी मनीषा यांचा आरडाओरडा ऐकून इतर शेजारी धावून आले.  त्यांनी बाळासाहेब यांना गेवराई येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले.  डॉक्टरांनी तपासून त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले. तिथे उपचार सुरु असताना बाळासाहेब रघुनाथ राठोड यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सदर फिर्यादीवरून प्रकाश अंकुश राठोड, वंदना प्रकाश राठोड, अंकुश लक्ष्मण राठोड, राम लक्ष्मण राठोड आणि अविनाश राम राठोड या पाच जणांवर गेवराई पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत.