Wed, Jul 17, 2019 20:30होमपेज › Marathwada › कापसाचे क्षेत्र घटले, सोयाबीनचे वाढले 

कापसाचे क्षेत्र घटले, सोयाबीनचे वाढले 

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 10:11PMजिंतूर : प्रतिनिधी

पावसाच्या अनियमिततेमुळे तालुक्याच्या काही भागांत खरिपाच्या पेरण्या रखडल्या असल्या तरी अद्यापपर्यंत झालेल्या भीज पावसामुळे तालुक्यात 80 टक्के पेरणी आटोपली आहे. यामध्ये कापसाच्या लागवड क्षेत्रात कमालीची घट झाली असून सोयाबीनचे क्षेत्र जवळपास अडीच पटीने वाढल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यात खरिपाचे 77 हजार 140 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 62 हजार 500 हेक्टर क्षेत्रातील पेरण्या आटोपल्या आहेत. तृणधान्याच्या 13 हजार 270 हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी मोकळे आहे.कडधान्याच्या 26 हजार 310 हेक्टरपैकी 22 हजार 850 हेक्टरमध्ये तूर, मूग व उडीद या पिकांची लागवड करण्यात आली असून गळीत धान्याच्या 11 हजार 30 हेक्टरच्या क्षेत्रात सोयाबीनमुळे मोठी वाढ होऊन 24 हजार 300 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र 9 हजार 720 हे. असताना दोन जूनपर्यंत 24 हजार 300 हेक्टरवर पेर करण्यात आली, तर कापसाच्या 25  हजार 530 हेक्टर क्षेत्रांपैकी 14 हजार 400 हेक्टरवर पेरणी झाली. तालुक्यात मान्सूनपूर्व व मान्सूनच्या प्रारंभी चांगला भीज पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांनी पुन्हा दमदार पाऊस होईल, या आशेवर पेरण्या सुरू केल्या; परंतु मध्येच पावसाने दडी मारल्याने पेरणीची कामे रखडली होती. 

त्यानंतर जूनच्या तिसर्‍या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बहुतेक भागांतील पेरणी उरकण्यात आली. बियाणांची उगवणही चांगली झाली तोच पावसाने दहा दिवस विश्रांती घेतली. त्यामुळे कोवळी रोपे माना टाकू लागली. शेतकरी चिंतेत पडला असताना गेले तीन दिवस झालेल्या पावसाने शेतकर्‍यांसह पिकांना दिलासा मिळाला.