Wed, Nov 14, 2018 18:46होमपेज › Marathwada › नगरसेवकांनी बुजवला ‘तो’ खड्डा

नगरसेवकांनी बुजवला ‘तो’ खड्डा

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 11:18PMमाजलगाव : प्रतिनिधी

शहरातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. याचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भातील वृत्त दै. पुढारीने प्रकाशित केले होते. याची दखल येथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेत शहरातील खड्डे स्वत:च बुजवून वाहनचालकांची त्रासातून मुक्‍तता केली आहे.

माजलगाव शहरात एकमेव मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा  असते. हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. आता हा रस्ता दिंडी मार्ग झाला असून त्याचे कामदेखील चालू आहे. शहरातील मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर स्वच्छतेचे काम नगरपालिका करते. या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी व नालीतील पाणी या खड्ड्यांमध्ये साचते. अनेकदा हे पाणी वाहनांमुळे उडून ते पादचार्‍यांच्या अंगावर उडते. यासह खड्ड्यांमुळे वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे.

असे असले तरी रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्याने नागरिकांतून नाराजी पसरली होती. यासंदर्भातील वृत्त दै. पुढारीने प्रकाशित केले होते. याची दखल येथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतली. शुक्रवारी नगरसेवकांनी खड्डे बुजवून वाहनचालकांना त्रासातून मुक्‍त केले. यावेळी भाजपचे नगरसेवक विनायक रत्नपारखी, शरद यादव, रोहन घाडगे, शेख मंजूर, नितीन मुंदडा, विजय शिंदे, ईश्‍वर होके, अरुण मुंडे, माणिक दळवी, पोळ आदी उपस्थित होते.