Fri, Aug 23, 2019 21:19होमपेज › Marathwada › #Women’sDay संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात  महिलांचे योगदान

#Women’sDay संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात  महिलांचे योगदान

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 2:06AMसंयुक्त महाराष्ट्र चळवळ ही सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी उभारलेले आंदोलन होते. सर्व दास्यातून मुक्त होऊन स्वतःचे भवितव्य स्वतः घडवू शकेल असा भारत निर्माण व्हावा हे भारतीयांचे स्वप्न होते. भाषावार प्रांत रचना म्हणजेच लोकशाहीच्या निकोप विकासाला संधी द्यावी हे होय म्हणूनच या चळवळीला अनन्य साधारण महत्व आहे. या चळवळीत ज्याप्रमाणे पुरुषांचा सहभाग होता. तेवढाच सहभाग स्त्रियांचा देखील होता, परंतु या लढ्यानंतर महिला मात्र उपेक्षितच राहिल्या. चळवळीची पाश्‍वभूमी जाणून चुलीपासून रस्त्यावर उतरणार्‍या या स्त्रिया इतिहासाचं पान मात्र होऊ शकल्या नाहीत. अनेक अर्थाने त्या पायाचे दगड झाल्या आणि पायापर्यंत राहिल्या.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील ठळक तीन मार्ग होते. या तीनही प्रकारच्या कार्यक्रमात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने उभ्या होत्या. लोकजागृती करणे आणि घराघरात हा लढा पोहोचवणे ही मुख्य उद्दिष्ट्ये होती. सरकारपर्यंत मोर्चाच्या माध्यमातून आवाज पोहोचवणे व सत्याग्रहातून सरकारला जेरीस आणणे या तीनही आघाड्यावर महिला अग्रेसर होत्या. 80 वर्षांच्या म्हातारीपासून ते 12-13 वर्षांच्या  मुलीपर्यंत आणि नवव्या महिन्यांतील गरोदर स्त्रियांपासून लेकुरवाळ्या महिलापर्यंत सार्‍याचजणी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी घराची चौकट ओलांडून लढ्यात सामील झाल्या. तिने केलेला हा प्रवास थक्क करणारा आहे.

जोपर्यंत कागदोपत्री कमिशन आयोग याद्वारे संयुक्त महाराष्ट्राची मागणी होती तोपर्यंत महिलांचा सहभाग कोठेही दिसत नाही, परंतु जेव्हा शहाणपणाच्या गोष्टीने प्रश्‍न सुटत नाही असे दिसते तेव्हा मात्र नाटाळांचा कपाळमोक्ष करण्यासाठी ती काठी घेऊन सज्ज झाली. मुंबईसह महाराष्ट्र या मागणीसाठी 106 लोकांना बलिदान द्यावे लागले. यात दोन महिला देखील होत्या. कमलाबाई मोहिते, ठमाबाई सूर्यभान या हुतात्म्यांसह अनेक महिलांनी आपले सक्रिय योगदान दिले.     संयुक्त महाराष्ट्र महिला परिषदेने पहिली महिला परिषद दक्षिण मुंबई येथे घेतली. या परिषदेला 15 हजार स्त्रिया उपस्थित होत्या. या परिषदेचे नेतृत्व सुमती गोरे, सुमती पै, तारा रेड्डी, कमलाबाई भागवत, दुर्गाबाई भागवत, शांताबाई गोखले, शांताबाई फाटक, इस्मत च्युगताई, सुलताना जोहरी, चारुशिला गुप्ते, इंदुताई साक्रीकर, गोदावरीबाई परुळेकर, विमला बागल यांनी केले. संयुक्त महाराष्ट्र हा एकच ध्यास बाकी सर्व खल्लास, ही नवीन घोषणा तयार केली. हळदी कुंकू, तिळगूळ या स्त्रियांच्या कार्यक्रमातून महिलांची जनजागृती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या एकाच प्रश्‍नावर केली. प्रत्यक्ष आंदोलनात महिलांचा सहभाग 18 नोव्हेंबर रोजी झाला. तिसर्‍या सत्याग्रही तुकडीचा मान महिलांना मिळाला. संयुक्त महाराष्ट्र हा एकच ध्यास बाकी सर्व खल्लास हा ध्यास घेऊन त्यांनी हे आंदोलन यशस्वी केले, परंतु कमलाबाई मोहिते आणि ठमाबाई सूर्यभान यांचे साधे स्मारक देखील नसावे याचे पुरोगामी महाराष्ट्राला काहीच वाटू नये याची खंत वाटते. 8 मार्च महिला दिनानिमित्त या समस्त स्त्रियांना अभिवादन!