Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Marathwada › कंत्राटी कर्मचार्‍यांचे राज्यव्यापी कामबंद

कंत्राटी कर्मचार्‍यांचे राज्यव्यापी कामबंद

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 2:07AMपरभणी : प्रतिनिधी

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत परभणी विभागांतर्गत कार्यरत कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने 15 फेबु्रवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यात परभणीतील कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदविला आहे.यामुळे सदरील  योजनेंतर्गतची सर्व कामे दोन दिवसांपासून निर्णय न लागल्याने शुक्रवारीही काम ठप्प झाले होते.

आंदोलनात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन लागू करावे, 2012 पासून न झालेल्या पगारातील फरकेची रक्कम त्वरित द्यावी, कायमस्वरूपी कर्मचार्‍यांप्रमाणे प्रवासभत्ता व इतर भत्ते लागू करावेत, वैद्यकीय रजा व महिला कर्मचार्‍यांकरिता प्रसूती रजा लागू करावी, अपघाती विमा लागू करावा, ईएसआयसी विमा लागू करावा, गटविमा व भविष्यनिर्वाह निधी लागू करावा. आजपर्यंत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामावर कार्यरत असताना अपघाती मृत्यू झालेल्या रूपेश दिघोरे व पाटील यांना वैद्यकीय खर्चाची रक्कम त्वरित द्यावी यांसह अन्य मागण्या दिलेल्या निवेदनात नमूद केल्या आहेत.

 परभणीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयालगत असणार्‍या या योजनेच्या कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचार्‍यांनी मागील दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यात 23 कर्मचार्‍यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता एस.एम.पडुळे, एम.टी.खान, डी.वाय. कुलकर्णी, आर.एस.गायकवाड, के.डी.मुंडे, आर.बी.हराळे,एम.एस.शेप, पी.यू.शेप, आर.पी.मुंडे, इमरान खान बशीरखान, व्ही.के.कुमकर, व्ही.ए.तिडके, एम.सालारी यांचा सहभाग आहे.