Mon, May 20, 2019 18:50होमपेज › Marathwada › बाळापूर कृउबा निवडणुकीत काँग्रेस-सेना भिडणार

बाळापूर कृउबा निवडणुकीत काँग्रेस-सेना भिडणार

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:09PMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

मागील चार वर्षांपासून प्रशासकाच्या खांद्यावर असलेली बाजार समितीची धुरा लवकरच लोकप्रतिनिधींच्या खांद्यावर दिली जाण्याचे संकेत असून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नव्या धोरणानुसार 15 गणांमधून 120 गावांतील तब्बल 51 हजार 384 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीची निवडणूक महत्त्वाची असून, या निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असून भाजपचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 2010 मध्ये घेण्यात आली होती. 8 मार्च 2015 मध्ये संचालक मंडळाची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासक नियुक्‍त करण्यात आले होते. तेव्हापासून प्रशासकावरच बाजार समितीचा कारभार सुरू आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या या बाजार समितीवर वर्चस्वासाठी काँग्रेस व शिवसेनेचा कायम वाद राहिला आहे. मध्यंतरी अशासकीय मंडळ नियुक्‍तीचे प्रयत्न झाले, परंतु या प्रयत्नाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक घेण्याची मागणी केली होती.

न्यायालयाने तीन महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होेते, परंतु मधेच मतदार यादीत शेतकर्‍यांचा नावाचा समावेश करावा असा निर्णय झाल्याने निवडणूक लांबणीवर पडली होती. नवीन नियमाप्रमाणे मतदार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील 120 गावांमध्ये 15 गण तयार करण्यात आले आहे. यामध्ये आखाडा बाळापूर, शेवाळा, घोडा, कांडली, वारंगा, डोंगरकडा, जवळा पांचाळ, दांडेगाव, पेठ वडगाव, सिंदगी, नांदापूर, पिंपळदरी, जलालदाभा, लाख, कोथळज आदी गणांचा समावेश असून यामध्ये 51 हजार 384 मतदारांचा समावेश आहे. मतदार यांद्यांना मंजुरी मिळताच बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. कधीही निवडणूक लागणार असल्यामुळे आतापासूनच काँग्रेस-शिवसेना व भाजपच्या पदाधिकार्‍यांनी बाजार समितीच्या निवडणुकीवर डोळा ठेवून तयारी चालविली आहे. 

काँग्रेसकडून खा. राजीव सातव, आ. डॉ. संतोष टारफे, कांँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, काँगे्रेसचे नेते सुरेश वडगावकर, म. जिया कुरेशी यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे, तर दुसरीकडे शिवसेनेत नव्यानेच आक्रमकरीत्या सक्रिय झालेले जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनीही या निवडणुकीत जोर लावण्याचा चंग बांधला आहे. भाजपचे नेते माजी आ. गजानन घुगे, माजी खा. शिवाजी माने यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची राहणार आहे. बाजार समिती निवडणुकीत किमान तीन पॅनल उभे राहतील, अशा हालचाली सध्या दिसून येत आहे. यामध्ये काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या पॅनलचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून, ऐन वेळी युती, आघाडीचा खेळही रंगण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. मतदार संख्या वाढल्याने निवडणूक खर्चिक बनणार आहे.