Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Marathwada › पक्षबांधणीत काँग्रेस, सेना, भाजप झाली आक्रमक

पक्षबांधणीत काँग्रेस, सेना, भाजप झाली आक्रमक

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 10:16PMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा अवधी असला तरी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मात्र इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस, शिवसेनेबरोबरच भाजपतील दिग्गजांनी गाव पातळीवर आपला संपर्क वाढविला आहे. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून पक्ष संघटन बळकट करण्याचे काम सध्या सर्वच पक्षांकडून सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

राजकीयदृष्ट्या अवघड व संवेदनशील विधानसभा मतदारसंघ म्हणून कळमनुरी मतदारसंघाचा उल्‍लेख केला जातो. या मतदारसंघात संमिश्र समाजाचे मतदार असल्याने येथे सर्वच पक्षाला विजयाची समान संधी कायम राहिली आहे. विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा कंबर कसली असून विकास कामाबरोबरच कार्यकर्त्यांना सोबत घेत संपर्क कायम ठेवला आहे, तर दुसरीकडे तब्बल 10 वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात माजी आ. गजानन घुगे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेत आलेली मरगळ दूर करण्यासाठी जिल्हा प्रमुख संतोष बांगर कामाला लागले आहे. विधानसभेसाठी बांगर यांची उमेदवारी ग्रहीत धरून त्यांनी शिवसेनेची पक्ष बांधणी नव्याने सुरू केली आहे. भाजपसाठी अवघड असलेल्या या मतदारसंघात माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे यांच्या भाजपा प्रवेशामुळे गाव पातळीवर भाजपची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सध्या दिसून येत आहे. युती, आघाडीबाबत अद्यापही

चित्र स्पष्ट नसले तरी भाजपकडून इच्छुक असलेले माजी आ. गजानन घुगे यांनीही भाजपची स्वतंत्र पक्ष बांधणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी बूथ पातळीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेचे बांगर यांनी नव्या जुन्यांची मोट बांधत गाव तेथे शाखा स्थापन करण्यावर भर दिल्याने सध्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचेवातावरण दिसून येत आहे. तीन प्रमुख पक्षाबरोबरच अजित मगर, विनायक भिसे यांनीही संपर्क वाढविल्याचे दिसून येत आहे.