Mon, Apr 22, 2019 23:40होमपेज › Marathwada › 64 ग्रामपंचायतींच्या इमारतींचा प्रश्‍न मार्गी

64 ग्रामपंचायतींच्या इमारतींचा प्रश्‍न मार्गी

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 10:33PMबीड/परळी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीला अद्याप इमारत नसल्याने त्या ग्रामपंचायतींचा कारभार किरायाच्या खोलीमध्ये वा चावडी, शाळेतील एखादी रूम अशा ठिकाणी भरत असे. या ग्रामपंचायतमधून कारभार चालविणेही धोकादायक होते. अशा परिस्थितीतील व ग्रामपंचायत इमारत नसणार्‍या जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये परळी तालुक्यात नऊ इमारत बांधल्या जाणार आहेत.

एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील 302 गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत बांधण्याचा महत्त्वपूर्ण  निर्णय ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. ग्रामविकास  खात्यामार्फत ही योजना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना म्हणून राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत ग्रामपंचायतीचा कायापालट होणार आहे. 

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता आणि स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन पंकजा मुंडे यांनी ही योजना आखली आहे. एक हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ज्या गावांत ग्रामपंचायत कार्यालयाची स्वतःची स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना  पहिल्या टप्प्यात इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येकी बारा लाख रुपये इतका निधी मिळणार आहे. यातील नव्वद टक्के रक्कम ग्रामविकास विभाग तर दहा टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने स्वनिधीतून द्यावयाची आहे. 

ग्रामपंचायतची ही नवीन इमारत दुमजली असून त्याचे क्षेत्रफळ 77.19 चौ.मी. म्हणजेच 839.17 चौरस फूट असणार आहे. यामध्ये जनसुविधा केंद्राबरोबरच तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक व ग्रामीण स्तरावरील शासकीय कर्मचारी यांना बसण्याची व्यवस्था तसेच मिटिंग हॉल, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असणार आहेत. ग्रामस्थांना शासकीय कागदपत्रांची देवाण-घेवाण करण्यासाठी स्वतंत्र खिडक्या देखील यात असणार आहेत.  ग्रामपंचायतला इमारत नसल्याने ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणहून कारभार हाकत होते. ग्रामस्थांना एखादे प्रमाणपत्र हवे असल्यास तालुक्याला जावे लागत होते. यामध्ये वेळ व पैसाही जात होता. त्यामुळे आता अशा ठिकाणी ग्रामपंचायत इमारत झाल्यास ग्रामस्थांना त्याचा फायदा होणार आहे. शिवाय नवीन इमारतीत इतर कार्यालयेही होणार असल्याने अधिकाधिक सेवा ग्रामस्थांना मिळणार आहेत.