Mon, Apr 22, 2019 22:03होमपेज › Marathwada › परळीत भरली स्पर्धा परीक्षेची जत्रा

परळीत भरली स्पर्धा परीक्षेची जत्रा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खडतर मेहनत तर घ्याच पण थोड्याशा अपयशाने खचून जाऊ नका. आनंदी मनाने स्वतःचे आयुष्य रेखाटा असा  सल्ला राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

जवाहर शिक्षण संस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे अ‍ॅकॅडमी तर्फे परळी येथे इयत्ता 5 वी ते 9 वी च्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने शालेय पातळीवर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर शनिवारी आयोजित करण्यात आले होते. तोतला मैदानावर झालेल्या या शिबिरात परळी तालुक्यातील दीडशेहून अधिक शाळांमधील सुमारे दहा ते बारा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळच्या सत्रात या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 

दुपारी शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. डॉ. प्रीतम मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आयआयटी प्रतिष्ठान व करिअर स्पेक्ट्रम पुण्याचे संचालक संजय कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्ताप्पा इटके, सुरेश अग्रवाल, सुरेश चौधरी, विजय वाकेकर, कैलास घुगे, प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर आदी उपस्थित होते. पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम  मुंडे यांचे संस्थेच्या वतीने  स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे  म्हणाल्या की,  शालेय जीवनात आपल्याला काय बनायचे आहे हे ध्येय विद्यार्थ्यांनी ठरवले पाहिजे. आजची पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे. व्यसन लावून घ्यायचेच असेल तर ते यशाचे लावून घ्या. ते लागले तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आजचे युग हे डिजिटल झाले आहे. त्याचा उपयोग करत स्पर्धेत कायम टिकून रहावे. आयुष्य हे आनंदी मनाने रेखाटून आपल्या आई वडिलांचे स्वप्न आत्मविश्वासाने पूर्ण करा असेही त्या म्हणाल्या.

यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांना धाडसीपणाने सामोरे जाऊन आयुष्य घडवावे असे आवाहन केले. स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले.

 

Tags : Beed, Beed news, school level, Competition Examination Guidance Camp,


  •