होमपेज › Marathwada › विजेत्या सुपुत्राच्या भेटीसाठी पाटोदेकरांची आतुरता शिगेला

विजेत्या सुपुत्राच्या भेटीसाठी पाटोदेकरांची आतुरता शिगेला

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:36AMपाटोदा : प्रतिनिधी

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवणार्‍या राहुल आवारेच्या यशाने पाटोदा तालुक्याचे नाव अगदी जागतिक स्तरावर उंचावले आहे. पाटोदा सारख्या ग्रामीण ग्रामीण भागातून कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या कठोर मेहनत व सरावाच्या बळावर राहुलने देशासाठी केलेल्या या कामगिरीचा गौरव करण्यासाठी, त्याच्यावर कौतुकाची थाप मारण्यासाठी अवघा पाटोदा तालुका राहुलच्या भेटीसाठी उत्सुक झाला असून आता संपूर्ण पाटोदेकरांना आपल्या जग्गजेत्या सुपुत्राच्या आगमनाची प्रतीक्षा आहे, शनिवार दि. 5 रोजी राहुलचा आपल्या गावच्या मातीत भव्य नागरी सत्कार सोहळा होत असून, त्याच्या स्वागतासाठी पाटोदा नगरी सज्ज झाली आहे.

राहुल आवारेने ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकल्या नंतर पूर्ण देशातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता पाटोद्यात देखील आपल्या सुपुत्राच्या यशाचा प्रचंड  आनंदोत्सवसाजरा करण्यात आला होता. त्याच्या सुवर्ण कामगिरीची माहिती मिळताच महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून येऊन अनेकांनी राहुलच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले. आपल्या या सुवर्ण कामगिरीने तालुक्याला जागतिक कीर्ती प्राप्त करून देणार्‍या राहुलचा आपल्या गावी म्हणजेच पाटोदा तालुक्यात सन्मान करण्यासाठी तालुक्यातील पााटोदेकर उत्सुक आहेत. यासाठी तालुक्यातील विविध संघटना, संस्था राहुलच्या या यशाचा सन्मान करण्यासाठी राहुलने आपल्या गावी येण्याकडे डोळे लावून बसले आहेत. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी त्याच्या सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये पाटोदा शहरामध्येच दि.5 मे रोजी  भव्य असा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.