Tue, May 21, 2019 00:05होमपेज › Marathwada › मनपा वृक्षप्राधिकरणचे अधिकार आयुक्‍तांना

मनपा वृक्षप्राधिकरणचे अधिकार आयुक्‍तांना

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 11:05PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेतील वृक्षप्राधिकरण समिती सध्या बरखास्त असल्याने वृक्षलागवडीसह विविध प्रश्‍न प्रलंबित आहेत. यामुळे यासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने वृक्षप्राधिकरण समितीचे अधिकार मनपा आयुक्‍तांना प्रदान करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत.

मनपाच्या वृक्षप्राधिकरण समितीत नगरसेवकांसह अशासकीय सदस्यांची नियुक्‍ती केली जाते. त्यापैकी तीन अशासकीय सदस्यांनी पात्रता पूर्ण न केल्याने न्यायालयाने तिघांची नियुक्‍ती रद्द करण्याचे आदेश दिले होते. यामुळे आता संबंधित सदस्यांच्या जागी इतर पात्र तीन सदस्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाने प्रस्ताव देखील मागविले आहे. परंतु, ही प्रक्रिया होण्यास बराच कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत संबंधित समितीचे अधिकार आयुक्‍तांना प्रदान करण्यात यावे, अशी मागणी मनपाचे वकील एम. एल. पाटील यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेत आयुक्‍तांना हे अधिकार प्रदान केले आहेत. यामुळे आता या समितीचे यापुढचे कामकाज मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे हे पाहणार आहेत. समिती अस्तित्वात नसल्याने वृक्षलागवड, धोकादायक वृक्षांची तोड, वृक्ष फांद्यांची छाटणी यांसह विविध विषय गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होते. ठाणे व मुंबई येथील आयुक्‍तांनाही समितीचे अधिकार प्रदान केले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात रोहित मनोहर जोशी यांनी याचिका दाखल केली होती. याच याचिकेच्या अनुषंगाने नाशिकचाही प्रश्‍न असल्याने न्यायालयाने याचिकेच्या निकालावर आधारित नाशिक येथील आयुक्‍तांनाही अधिकार दिले आहेत.