होमपेज › Marathwada › पी. शिवशंकर यांची नाशिकला बदली

पी. शिवशंकर यांची नाशिकला बदली

Published On: May 03 2018 1:30AM | Last Updated: May 02 2018 9:10PMपरभणी : प्रतिनिधी 

राज्यातील 27 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची बदली नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्‍ती देऊन करण्यात आली आहे. सनदी अधिकारी शंतनू गोयल हे परभणीचे नवे जिल्हाधिकारी राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्‍लर यांच्या स्वाक्षरीने हा आदेश पारित करण्यात आला आहे.

मागील वर्षी तत्कालीन जिल्हधिकारी राहुलरंजन महिवाल यांच्या बदलीमुळे रिक्‍त झालेल्या जागेवर पी. शिवशंकर आले होते. कोल्हापूर महानगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर 3 एप्रिल 2017 रोजी ते परभणीत जिल्हाधिकारीपदी रूजू झाले होते. त्यांनी आपल्या एक वर्षाच्या काळात वाळूमाफियांविरुद्ध कठोर धोरण राबविले. तसेच प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांची बदली नाशिकला झाली असून डी.के. जगदाळे यांच्या रिक्‍त जागी नियुक्‍ती देण्यात आली आहे. पदाचा भार अन्य अधिकार्‍यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. 

Tags : Parbhani, Collector, P. Shivshankar, transfer, Nashik,