Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Marathwada › मारहाणीच्या निषेधार्थ जिल्हाभरात लेखणी बंद

मारहाणीच्या निषेधार्थ जिल्हाभरात लेखणी बंद

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:21AMबीड : प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव सज्जाचे तलाठी विठ्ठल आमलेकर यांना वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आली. गेवराई तालुक्यासह जिल्हाभरात सातत्याने वाळू माफियांकडून महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांवर सातत्याने हल्ले होत असून त्यांना धमकीही दिली जात आहे. गेवराई प्रकरणातील वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, तसेच जिल्हाभरात वाळू माफियांविरोधात ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाभरात लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राजपत्रीत अधिकारी संघटना, कर्मचारी व तलाठी संघटनेने सहभाग घेतला होता. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही करण्यात आले. 

गेवराई तालुक्यात सर्वाधिक अवैध वाळू उपसा केला जात आहे. गेवराई येथून गोदावरी, सिंदफणा या नद्यांमधून हा अवैध वाळू उपसा केला जातो. गेवराई येथून बीड, लातूर, पुणे, उस्मानाबाद, परभणी आदी शहरात वाळू पुरविली जाते. वाळूला चांगला दर मिळत असल्याने या धंद्यात मोठ्या प्रमाणात वाळू निर्माण झाले आहेत. वाळू माफियांकडून दरवर्षी एखाद दुसर्‍या महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण करून दहशत कायम ठेवली जाते. हीच दहशत मोडीत काढण्यासाठी गेवराईचे तहसीलदार यांनी तलाठ्यांना बंदूक देण्याचे जाहीर केले होते. यानंतर वाळू माफियांना काहीकाळ लगाम बसला होता, मात्र त्यानंतर पुन्हा वाळू माफियांनी सक्रिय होत तत्कालीन नायब तहसीलदार वैजिनाथ जोशी यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते, तसेच विकास गोर्डे फोनवरून धमकी दिली होती.