Tue, Jul 23, 2019 02:11होमपेज › Marathwada › ग्रामीण भागात ठिकठिकाणी बंद

ग्रामीण भागात ठिकठिकाणी बंद

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 09 2018 9:55PMपरभणी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होवून जिल्ह्यात ठिकठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. तसेच काही ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. पाथरी, पुर्णा, मानवत, गंगाखेड, सोनपेठ, पालम, जिंतूर, सेलू तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. 

मानवत : तालुक्यात मराठा आरक्षण प्रश्नी कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील कोल्हा, देवलगाव अवचार, मंगरूळ व मानवत येथे तहसील समोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. रत्नापूर येथील टोल नाका जमावाने फोडल्याची घटना घडली. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी रस्त्यावरच भजन, किर्तन व भोजन करून अनोखे आंदोलन केले.तालुक्यात सकाळी 9 वाजल्यापासूनच आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शहरातील तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर  तसेच मानवतरोड व कोल्हा जवळील सेलू फाट्यावर, देवळगाव अवचार पाटी वर, मंगरूळ व केकरजवळा येथे जोरदार रास्ता रोको करण्यात आला . 

रत्नापूर येथील टोलनाका येथे काही आंदोलकांनी दगडफेक करीत टोलनाका फोडला. सेलू फाटा येथे आंदोलकानी तर रस्त्यावरच भजन, किर्तन यासह सामूहिक भोजनाच्या पंगती उठवल्या. 
मानवत शहरातील बाजारपेठही अत्यावश्यक सेवा वगळता सकाळपासून कडकडीत बंद राहिली.पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पाथरी तालुक्यात तीन ठिकाणी चक्काजाम आंदोलन; शहरासह संपूर्ण तालुका ठप्प

पाथरी : पाथरी तालुका सकल मराठा समाज बांधवांनी बुधवारी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाथला. सकाळपासून सकळ मराठा बांधवांनी तालुक्यातील आष्टी फाट्यावर, पोखर्णी फाटा या दोन ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येने उपस्थित होवून चक्काजाम आंदोलन सुरु केले. तसेच बाभळगाव फाटा येथे सकाळी 9 वाजता केलेल्या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पोखर्णी फाट्यावरील आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष भावनाताई नखाते, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, सभापती अनिलराव नखाते, डॉ.जगदीश शिदे, शाम धर्मे, तुकाराम पोळ, केशव बागल,संदीप टेगसे,अविराज टाकलकर,बापु कोल्हे,अ‍ॅड. रमेश सिताफळे,अशोक पोळ,भागवत टाकलकर यांच्यासह सकल मराठा युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आष्टी फाट्यावर बैलगाडीसह चक्काजाम आंदोलन करण्यात आले. येथे राष्ट्रीय महामार्गावर भजन किर्तन करण्यात आले.  सरकारच्या ढोंगी पणावर विविध भारुडे सादर करण्यात आले. चोख बंदोबस्त ठेवला होता.

सोनपेठ शहरासह तालूका कडकडीत बंद

सोनपेठ:  शहरासह तालुक्यात सर्व व्यापारपेठ कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यापार्‍यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. बंदमुळे स्थानकातून सकाळपासून एकही बस आली अथवा गेली नाही. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आले होते.तसेच तालुक्यातील गवळी पिंपरी येथील सोनपेठ,गंगाखेड,परळी या जिजाऊ चौकात आंदोलकांनी ह.भ.प.नामदेव महाराज फपाळ यांचे कीर्तन व महाप्रसाद झाला.  मुख्य रस्त्यांवर बैलगाडी व दुचाकी लाऊन आंदोलने करण्यात आली. उक्कडगांव मक्ता, नरवाडी, डिघोळ, शेळगांव, खपाट पिंपरी, वाणीसंगम, आवलगांव, सायखेडा व अन्य ठिकाणीही  चक्काजाम, रास्तारोको, ठिय्या आंदोलन करण्यात आले.

चारठाणा येथे आंदोलन शांततेत

चारठाणा : येथे टी-पॉईंटवर झालेल्या रास्तारोको आंदोलनात मुस्लीम बांधवही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. येथे शंभर टक्के बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाने पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी सपोनि अजयकुमार पांडे, पोउनि सुभाष भिसे, मंचक जाधव, एस.आर. राऊत, एस.जी. सुर्यवंशी, सतीश राठी, अनवर खान, आबासाहेब कदम, दत्ता गिराम, दत्ता त्रिमोरे आदींनी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

मुस्लीम समाजबांधवांचा पाठिंबा
 
मोर्चादरम्यान जलील ईनामदार, तहसीन देशमुख, राजू काजी, शेख गफ्फार, कासीम ईनामदार, शेख सुलेमान, गफ्फार मौलाना, शेख रफीक, रफ्तार पठाण, सय्यद गणी, जब्बार ईनामदार, पाशा कुरेशी, शकील कुरेशी, अनिस पठाण, फिरदोस पठाण, लुकमान इनामदार, जब्बार इनामदार, मुसा शेख, शेख मुजाहेद, इरफान इनामदार, सय्यद अरशद आदी मुस्लीम समाजबांधवांची उपस्थिती होती. 

जोगवाडा पाटीवर रास्ता रोको : औरंगाबाद-नांदेड रोडवर जोगवाडा या ठिकाणी मराठा समाजाच्या करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनामध्ये परिसरातील सोस,भांबरी, पांढरगळा, सावरगाव यासह इत्यादी गावातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी विविध घोषणा दिल्या. चारठाणा पोलीस ठाण्यांतर्गत मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. 

चुडावा येथेही रास्ता रोको : आरक्षण मागणी आंदोलनात शहीद झालेल्या बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली. शासनाच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. गावातील सर्व दुकानदारांनी बंद पाळला. बाहेर गावातील मराठा समाज बाधंव हजर होते. तसेच सर्व उपस्थित बांधवांना भोजनाची व्यवस्था  करण्यात आली होती तर पगंती रोडवरच बसवल्या होत्या. अशाप्रकारे रास्ता रोको करुन बंद पाळण्यात आला .

देवगाव फाटा  येथे बंद : येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील नागठना, गिरगाव, नांदगाव, बोरकिनी येथील सर्व समाज बांधवांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. दरम्यान  समाज बांधवांनी घोषणाही दिल्या. आंदोलनात  रमेश महाराज, संतोष गरड,भगस,अमोल सातपुते,पवन मोरे यांनी मार्गदर्शन केले.दरम्यान भगवान सातपुते, सर्जेराव मोरे यांनी आंदोलनात हलगी वादन केले. रुग्णवाहिकेस रस्ता मोकळा करून देण्यात आला. नायब तहसीलदार बहुरे यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर पवन मोरे, अमोल सातपुते, भगवान सातपुते, यादवराव मोरे आदींच्या सह्या आहेत.