Fri, Mar 22, 2019 01:26
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › भरपावसात नागरिकांचे आंदोलन-उपोषण

भरपावसात नागरिकांचे आंदोलन-उपोषण

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 17 2018 1:35AMपरभणीः प्रतिनिधी

दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जोर धरून संततधार सुरुवात केली. विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार्‍या विविध ठिकाणचे नागरिक, विद्यार्थ्यांनी उपोषण, ठिय्या आंदोलन केले. पीकविम्यासाठी 26 जूनपासून उपोषण करत असलेल्या शेतकर्‍यांची तिसरी फळी बेमुदत उपोषणास  भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात न्यायासाठी ठाण मांडून बसली होती. 

रस्त्यासाठी  बैलजोडींसह उपोषण 

परभणी तालुक्यातील शिर्शी खु. परिसरातील गट नं. 108, 121 व 122 मधून वहिवाट जाणारा गाडीरस्ता शासकीय असतानाही काही शेतकर्‍यांनी तो दीड वर्षापासून अडवला. 16 जुलैपासून बैलजोडींसह उपोषण सुरू झाले आहे. तत्पुर्वी रस्ता सुरू करावा यासंदर्भात 6 मार्चला  प्रशासनास निवेदन दिले होते.  तेव्हा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आठ दिवसांत रस्ता काढून देण्याचे लेखी आश्‍वासन दिले, परंतु अद्यापपर्यंत रस्ता न झाल्याने शेतकर्‍यांनी जिल्हा कचेरीसमोर  बेमुदत उपोषण केले.यात शिर्शी खु. येथील राम कोडेवाड, मारुती कोडेवाड, रामदास कनके, मधुकर कनके, शंकर कोठेवाड, कैलास कोठेवाड, केशव कनके, संजय कनके, बाजीराव कनके, मंचक कनके, गणेश कनके, बाजीराव कनके, मंचक कनके, गणेश कनके, कपिल कनके, नामदेव कनके, लक्ष्मण कनके यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले. दरम्यान  उपोषणास टायगर ग्रुप, महाराष्ट्रातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन  रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी मागणी प्रीतम खंदारे, शिवाजी रेंगे, वैभव मोरे, बाबा अवचार, अनिल मदने यांनी केली आहे. 

नगरसेवकासह नागरिकांचे उपोषण 

घरकूल लाभार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे संबंधित घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा याकरिता शिवसेना नगरसेवक सुशील कांबळे यांनी मनपाच्या कार्यालयासमोर 16 जुलैपासून  लाभार्थ्यांसह उपोषण सुरू केले आहे. भीमनगर, क्रांतीनगर, रोशनीनगर, ताडेश्‍वरनगर या भागातील लाभार्थ्यांनी रमाई घरकूल आवास योजना व पंतप्रधान घरकूल आवास योजनेंतर्गत अर्ज केले होते, परंतु मनपा प्रशासनातर्फे विकास आराखड्याचे कारण देऊन सर्व अर्ज त्रुटीत काढण्यात आले आहेत. सदरील भागात विविध शासकीय कामे झाली असतानाही मनपातर्फे परिसरातील लाभार्थ्यांना घरकुलाच्या योजनेपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत वंचित ठेवल्या जात आहे, असा आरोप उपोषणकर्त्यांनी मनपा आयुक्‍तांकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मोफत दूध वाटप करून शासनाचा निषेध  

राज्य शासनाच्या वतीने दुधाला 35 ते 45 रुपये प्रति लिटर दरभाव देण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात दूधबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत शासन दुधाच्या दरवाढीसंदर्भात योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांनी दूधबंद आंदोलन करण्याचा निर्धार घेतलेला आहे. याचाच एक भाग म्हणून 16 जुलै रोजीपासून हे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, परभणी जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक  परिसरात दुपारी मोफत दूध वाटप करून दुधाला दर वाढून न देणार्‍या शासनाचा  निषेध व्यक्‍त करण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या :

तालुक्यातील दुर्डी येथील शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी 16 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. दुर्डी ते धार या 2 कि.मी.रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना शाळेसाठी परभणी, धार या गावी यावे लागते, परंतु रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे संबंधितांनी लक्ष न दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन मागणी केली, परंतु जिल्हाधिकारी यांच्याकडूनही सकारात्मक आश्‍वासन न मिळाल्याने भ्रमनिरास झाला असल्याच्या भावना विद्यार्थी व गावकर्‍यांनी व्यक्‍त केल्या. यावेळी कीर्ती चोपडे,सारिका आळसे, निकीता कांबळे, नवनाथ आळसे, मोहन जाधव, सुंदर चोपडे, रंगनाथ आळसे, ओंकार चोपडे, रंगनाथ चोपडे मुंजाभाऊ चोपडे, पवन चोपडे या विद्यार्थ्यांसह उपसरपंच रंगनाथ चोपडे, तुकाराम चोपडे, व्यंकटराव चोपडे, विक्रम चोपडे, माउली चोपडे, शंकर चोपडे, हरिभाऊ चोपडे उपस्थित होते.