Mon, May 27, 2019 00:43होमपेज › Marathwada › दुसर्‍या ‘ललिता’वरही होणार शस्त्रक्रिया

दुसर्‍या ‘ललिता’वरही होणार शस्त्रक्रिया

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 22 2018 11:06PMमाजलगाव : प्रतिनिधी 

माजलगावच्या पोलिस दलातील ललिताचा ललितकुमार झाल्यानंतर शहरातील पाच वर्षीय बालकाचे प्रकरण दै. पुढारीने समोर आणले होते. या बालकाच्या लिंग बदलण्याच्या तपासण्या केल्या असून हे मूल मुलगी नसून मुलगाच असल्याचे तपासणीत आढळले आहे. त्याचे मुलगा म्हणून आधार कार्ड काढा असा सल्ला ललिताला ललितकुमार करणारे डॉ. रजत कपूर यांनी बाळाच्या आई वडिलांना दिला आहे. या बालकावर पुढील महिन्यात लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

महिला पोलिस ललिताच्या प्रकरणानंतर माजलगाव शहरात एका 5 वर्षांच्या बाळामध्ये असेच बदल असल्याचे वैद्यकीय तपासणीत दरम्यान समोर आले. शहरात मोलमजुरी करणार्‍या एका व्यक्तिस एक मुलगा व दोन मुली आहेत. यातील सर्वात लहान मुलीला त्रास होत असल्याने तिला बीड येथील त्वचारोग तज्ज्ञास दाखवले. यावेळी डॉक्टरांना या बाळामध्ये मुलाची लक्षणे आढळली. त्यानुसार बाळाच्या रक्ताच्या विविध तपसाणी व सोनोग्राफी केली असता पोटात गर्भशयाची पिशवी आढळली नाही, तसेच बाळाच्या हार्मोन्समध्ये बदल असल्याचे आढळून आले, मात्र शस्त्रक्रियेची काहीच माहिती नसल्याने आई-वडिलांसमोर पेच निर्माण झाला.

ललिताच्या प्रकरणामुळे पाच वर्षांनंतर बाळाच्या वडिलांना धीर मिळाला असून या प्रकरणी दै. पुढारीने वृत्त प्रकाशित केल्यानंतर बाळाच्या आई-वडिलांना मदतही झाली. गेल्या आठवड्यात या बाळाच्या वडिलांनी मुंबई येथे सर सेन्ट जार्ज हॉस्पिटल येथील प्लास्टिक सर्जन डॉ.रजत कपूर यांची भेट घेतली. डॉ. कपूर यांनी बाळाची प्राथमिक तपासणी केली असता सदरील बाळ मुलगी नसून मुलगा असल्याचे त्यांना आढळले. या बाळाच्या रक्ताच्या एकूण नऊ तपासण्या करण्यासह छातीचा एक्सरे काढण्यात आला. आता लवकरच बाळावर लिंगबदल शस्त्रक्रिया येणार असल्याचे बालकाच्या कुटुंबीयांनी सांगितले.

मुलगा म्हणून आधारकार्ड काढा

या बाळाचे वय 5 वर्ष होत असून शरीरातील बदलामुळे याला मुलगी म्हणावे की मुलगा हा पेच निर्माण झाल्याने अजुनपर्यंत बाळाचे आधारकार्ड व जन्मदाखला कुटुंबीयांनी काढला नाही. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार या बाळाचे आधार कार्ड मुलगा म्हणूनच काढण्यात येणार असून पुढील वर्षी शाळेत मुलगा म्हणून दाखल करण्यात येणार आहे.