Thu, Jul 18, 2019 02:09होमपेज › Marathwada › गगनभेदी घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की जय... 

गगनभेदी घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की जय... 

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:55AMबीड : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय जिजाऊ, जय शिवराय... तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय... अशा गगणभेदी घोषणांनी सोमवारची सायंकाळ बीडकरांसाठी ऐतिहासिक ठरली... निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीचे. यामध्ये मणिपूर, केरळ, गोवा राज्यातील कलाकारांनी कला सादर करीत बीडकरांची मने जिंकली. लेझर शोने डोळ्यांचे पारणे फेडले. अतिशय उत्साहात सुुरू झालेल्या या मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जिजाऊ वंदनेने झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव बीडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या शिवजन्मोत्साचा समारोप सोमवारी शिस्तबद्ध काढण्यात आलेल्या मिरवणुकीने झाला. या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रासह मणिपूर, केरळ, गोवा आदी राज्यातील कलाकारांनी सहभाग घेतला होता. मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी गगणभेदी घोेेषणा दिल्याने शहर दणाणले होते.

संदीप क्षीरसागर, जयंती अध्यक्ष प्रा. विजय पवार, नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मिरवणुकीत तरुणांचा सळसळता उत्साह दिसून आला. स्वाभिमान शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य स्वरुपात शिवजन्मोत्सव साजरा केला. तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या शिवजन्मोत्सवात अभिनेते सयाजी शिंदे व डॉ. विठ्ठल लहाने यांचे व्याख्यान झाले. यासह प्रा. बनबरे यांचे व्याख्यान, विजय तनपुरे यांचा पोवाडा, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रम झाले. 

सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांसह शिवभक्तांनी अभिवादन केले. यानंतर दुपारी 2 च्या सुमारास मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली. यावर्षी मिरवणुकीमध्ये मणिपूर, केरळ, गोवा या राज्यातील कलाकारांनी सहभाग घेतला होता. मणिपूर व गोव्यातील कलाकारांनी चित्तथरारक कलाप्रकार सादर करून बीडकरांची मने जिंकली.