Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Marathwada › जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे

जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 10:31PMबीड : प्रतिनिधी

चांगल्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या शिक्षकांना मंगळवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश मिळाले. या बदल्यांना ग्रीन सिग्नल मिळताच आता इतर क व ड वर्गाच्या बदल्यांचेही जोरदार वारे वाहू लागले आहे. यासाठी समुपदेशनाने बुधवारी व गुरुवारी बदल्या करण्यात येणार आहेत. 

गतवर्षीपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या या ऑनलाइन करण्यात येत आहेत. गतवर्षी शिक्षकांच्या जिल्हास्तरीय बदल्या ऑनलाइन झाल्या होत्या, मात्र जिल्हांतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या. यावर्षी जिल्हास्तरीय व जिल्हांतर्गत बदलीही ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिक्षक प्रतीक्षा करीत होते. सोमवारी सायंकाळी बदल्यांसाठी प्रक्रिया झाली. मंगळवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेतून संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आले. सायंकाळीच हे आदेश केंद्रीय मुख्याध्यापक व मुख्याध्यापक यांना बजाविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 

शिक्षकांच्या बदल्यानंतर आता जिल्हा परिषदेत विविध विभागातील गट क व ड संवर्गच्या बदल्यांसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार केला जात असल्याचा आरोपही होत होता. आता मात्र ऑनलाइन बदली प्रक्रिया होत असल्याने अशा प्रकारास चाप बसला आहे. जिल्हा परिषदेतील कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे विभाग, आरोग्य व शिक्षण विभागातील गट क व ड संवर्गातील बदल्या आज बुधवारी रोजी करण्यात येणार आहेत. तर,पंचायत, सामान्य प्रशासन, वित्त व बाल कल्याण विभागातील बदल्या उद्या गुरुवारी करण्यात येणार आहेत. या बदल्यांमध्ये प्रशासकीय व विनंतीबदल्या केल्या जाणार आहेत. 

बदली प्रक्रियेवेळी काही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. सदरील बदली प्रक्रिया ही बसस्थानकासमोरील स्काऊट भवन येथे सकाळी दहा पासून होणार आहे. यावेळी संबंधित कर्मचार्‍यांस उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

प्रक्रियेची होणार व्हिडिओ शुटिंग

बीड जिल्हा परिषदेत गतवर्षीपासून पारदर्शकपणे बदली प्रक्रिया राबविली जात आहे. बदली करण्यासाठी कोणी हात ओले करू नयेत, अथवा सेटिंग लावू नये, यासाठी नियमांना धरूनच बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये अनुचित प्रकार घडू नये वा नंतर कोणी आक्षेप घेतल्यास सत्यता दाखविता यावी, यासाठी बदली प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ चित्रीकरणाखाली करण्यात येणार आहे.