होमपेज › Marathwada › कॅरीबॅग जोमात, बंदी कोमात

कॅरीबॅग जोमात, बंदी कोमात

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 9:54PMआष्टी : सचिन रानडे

पर्यावरण संवर्धनासह कॅरीबॅग, प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. प्लास्टिकचा सर्वाधिक वापर ग्राहकांकडून कॅरीबॅगच्या माध्यमातून केला जात आहे.  बंदी असली तरी आष्टीत मात्र कॅरीबॅगचा वापर जोमात सुरू आहे, तर प्लास्टिक बंदी कोमात असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र व राज्य सरकारने प्लास्टिकचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. यामुळे प्लास्टिक बंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्लास्टिकच्या दुष्परिणामाचे परिणाम जगाला भेडसावत असताना भारतही त्यातून सुटलेला नाही. देशात दरवर्षी 15 हजार टन प्लास्टिक कॅरीबॅगचा कचरा जमा होता. त्यापैकी नऊ हजार टन प्लास्टिक कॅरीबॅगचा उचल केली जाते.

प्लास्टिकच्या 20 मायक्रॉनच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. एवढेच नाही, तर प्लास्टिक वापरणार्‍यांना दंड व शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. असे असले तरी आष्टी शहरामध्ये मात्र प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर सर्रास होत आहे. ग्राहक आणि व्यापारी कॅरीबॅगचा आजही मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. त्यामळे कॅरीबॅग बंदीस आष्टीत केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग वापरणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई झाली.  आष्टीत अशी कारवाई होत नसल्याने कॅरीबॅग बंदीला जुमानले जात नाही. पर्यावरणाचा धोका ओळखून कॅरीबॅग बंदी राबविण्याची गरज सुजान नागरिकांतून व्यक्त होत आहे.