Thu, Jun 27, 2019 04:04होमपेज › Marathwada › पोलिसच बनले ‘त्यांचे’ पालक

पोलिसच बनले ‘त्यांचे’ पालक

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 5:57PM
परभणी : प्रतिनिधी 

गायींना घेऊन जाणारा टेम्पो पकडून काही युवकांनी तो बुधवारी पोलिसांच्या ताब्यात दिला होता. यावर पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. शिवाय टेम्पोतील जनावरे ठाण्यात बांधून ठेवण्यात आली. दोन दिवस ठाण्याच्या आवारातील गायींचा सांभाळ करत  त्यांना चारा-पाणी दिला जात असल्याने ग्रामस्थांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. 

6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास नवामोंढा पोलिसांच्या हद्दीत वांगी रोडवर गायींना घेऊन जाणारा टेम्पो युवकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला होता. गायींची कत्तल करण्याच्या उद्देशाने जाणारा हा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेऊन जनावरांना ठाण्यात सुखरुपपणे ठेवले. वाहन चालकासह इतर दोन अज्ञातांवर गुन्हा दाखलही करण्यात आला. दरम्यान जनावरांच्या पालन-पोषणाचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी असलेल्या पोलिस उपनिरीक्षक अच्युत मुपडे व गोविंद धंदे यांनी गायींची सेवा करण्याचा योग हे पुण्यकर्म समजून दिवसभर पाणी व चार्‍याची व्यवस्था केली. या प्रकरणासंदर्भात न्यायालयास पत्र देवून कळविण्यात आले आहे.

गुरूवारी यावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तोपर्यंत ठाण्यात असलेल्या या गायींची गोपालकाप्रमाणे सेवा केली जाईल अशी माहिती मुपडे यांनी दिली. दरम्यान मुख्य आरोपीच्या तपासासाठी टेम्पोच्या मालकाचा शोध सुरु आहे.