होमपेज › Marathwada › पंचायत समितीवर सीसीटीव्हीची नजर

पंचायत समितीवर सीसीटीव्हीची नजर

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 10:19PMपाटोदा : प्रतिनिधी

येथील पंचायत समीती कार्यालयात मागील एक वर्षाच्या काळात अनेक घटना घडल्या. त्यामध्ये दोन वेळा दस्तावेज जळीत प्रकरण तर मागील एक महिन्यापूर्वी याच ठिकाणी संगणक चोरीची घटना घडली होती. या सर्व घटना घडल्यानंतर आता प्रशासनाला उपरती आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून   पंचायत समिती परिसरावर नजर ठेवण्यासाठी बारा सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसविण्यात आले आहेत .

पाटोदा पंचायत समिती कार्यालयात मागील वर्षी म्हणजे मार्च 2017 मध्ये पहिल्यांदा दस्तावेज जाळण्याचा प्रयत्न झाला. या मध्ये पाणीपुरवठा संबंधित दस्तावेज व कागदपत्रांवर डाव होता, मात्र त्यामध्ये फारसे यश आले नाही. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच म्हणजेच ऑगस्ट 2017 मध्ये मात्र मध्यरात्रीच्या सुमाराच खिडकीतून पेट्रोलचे फुगे फेकून दस्तावेज जाळण्यात आले. यात इमारतीतील फर्निचर व छत ही जळून खाक झाले होते, एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही व या दोन्ही घटनांचा तपास पोलिसांकडे सोपविण्यात आल्यानंतरही या प्रकरणांचा पूर्णतः छडा लागलाच नाही. या प्रकरणी संशयाचा धूर अजुनही कायम आहे.

कामचुकार कर्मचार्‍यांवर वचक : या सर्व घटना घडल्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समिती कार्यालय व परिसरात बारा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व कॅमेर्‍यांच्या आवाक्यातील हालचाली गटविकास अधिकार्‍यांच्या दालनातील स्क्रिनवर दिसणार आहे. या कॅमेरे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे असले तरीही हे  प. स. चे सर्व विभाग निगराणीखाली येत असल्याने अर्थातच कामचुकार कर्मचार्‍यावर देखील वचक राहण्यास मदत होणार आहे. त्यांच्यासाठी मात्र ही बाब त्रासदायकच ठरणार आहे.

संगणक चोरीप्रकरणाचाही तपास नाही : या जळीत प्रकरणांचे रहस्य कायम असतानाच मागील एक ते दीड महिन्यांपूर्वी पाटोदा पंचायत समितीत नवीन आलेल्या संगणकांपैकी एक संपूर्ण सेटच अगदी कुलूप न तोडताच अगदी सराईतपणे चोरीला गेला हा तपासही पोलिसांकडे गेला मात्र अद्यापही त्याचे गुढ कायमच आहे.