Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Marathwada › तूर खरेदी हेक्टरी साडेआठ क्‍विंटल

तूर खरेदी हेक्टरी साडेआठ क्‍विंटल

Published On: Feb 07 2018 1:34AM | Last Updated: Feb 07 2018 12:50AMजालना : प्रतिनिधी

शासकीय तूर खरेदी केंद्रावर कृषी विभागाने काढलेल्या निर्देशानुसार खरेदी करावी, असे निर्देश शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिले. तूर एक हेक्टरी साडेआठ क्‍विंटलच शासन खरेदी करणार आहे. उर्वरित तूर खासगीत मातीमोल किमतीत विकावी लागणार आहे. तूर खरेदीची मर्यादा 15 क्‍विंटलपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.  

जिल्ह्यात तुरीसोबत आंतरपीक पेरलेल्या शेतात बहुतांश शेतकर्‍यांना एकरी पाच ते सात क्‍विंटल उत्पादन होत आहे; परंतु शासनाच्या नियमानुसार साडेतीन-साडेआठ क्‍विंटल तुरीचीच खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित तूर खासगी व्यापार्‍यांच्या घशात मागेल त्या किमतीला विकावी लागणार आहे. दुष्काळ, अल्प उत्पादन व त्यातच मातीमोल भाव यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिवस काढणे कठीण झाले आहे. 

खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद व बोंडअळींमुळे कपाशी नेस्तनाबूत झाली. त्यातच उत्पादन नसताना सर्वच शेतमालांचे भाव खर्चाच्या तुलनेत मातीमोल आहेत. खरिपातील बहुतांश पिके हातातून गेल्याने शेतकर्‍यांच्या आशा तूर व हरभर्‍यावर टिकून आहेत. सध्या तूर व हरभर्‍याचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात तुरीला सरासरी 4200 रुपये प्रतिक्‍विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी सुरू होऊन किमान 5450 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळतील, अशी आशा शेतकर्‍यांना होती; परंतु शेतकर्‍यांच्या पाठीशी असलेल्या शासनानेच खरेदी केंद्रांवर उत्पादकतेची विचित्र अट टाकल्याने निम्मी तूर खुल्या बाजारात मातीमोल भावाने विकावी लागणार आहे.

जिल्ह्यात कृषी विभागाने तुरीची उत्पादकता हेक्टरी 8 क्‍विंटल 57 किलो काढली. या उत्पादकतेनुसारच शासकीय खरेदी केंद्रावर तूर खरेदीचे निर्देश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यात शेतकरी उडीद, मूग, तुरीचे आंतरपीक घेतात. तुरीच्या प्रत्येक ओळीनंतर चार ते पाच ओळी उडीद, मुगाची लागवड केली जाते.

 बहुतांश शेतकर्‍यांना आंतरपीक असलेल्या शेतात एकरी पाच ते सात क्‍विंटल तुरीचे उत्पादन होत आहे; परंतु शासनाच्या या अफलातून निर्णयामुळे शासकीय खरेदी केंद्रावर सरासरी साडेतीन क्‍विंटलचीच खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित तूर शेतकर्‍यांना मातीमोल भावात खुल्या बाजारात विकावी लागणार आहे.