Fri, Nov 16, 2018 04:32होमपेज › Marathwada › आचारसंहितेमुळे कामांना ब्रेक

आचारसंहितेमुळे कामांना ब्रेक

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:42AMबीड : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या आचार संहितेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर काही विभागांतून होणार्‍या कामांना ब्रेक लागला आहे. ग्रामीण भागातून विविध कामे होऊन लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात येत आहेत, मात्र सध्या आदर्श आचार संहिता सुरू असल्याने अनेक कामे करण्यास अधिकारी आचार संहिता असल्याची अडचण सांगत आहेत. 
बीड-उस्मानाबाद-लातूर या स्थानिक स्वराज्य संस्थेची आचार संहिता सध्या सुरू आहे. यासाठी 21 मे रोजी मतदान तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची सध्या आदर्श आचार संहिता सुरू आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पाडतील व सत्ताधार्‍यांच्या पथ्यावर पडतील, अशी कामे करू नयेत असे आचार संहितेमध्ये सूचविण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये महत्त्वाच्या कामांना सध्या 24 मे पर्यंत ब्रेक लागला आहे. 

आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच यासह इतर नेते अनेक विकासाच्या योजना मंत्रालयातून मंजूर करून आणतात. या योजना व यातील कामे ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी कार्यालय अशा कार्यालयांमधून राबविली जातात. 

सार्वत्रिक निवडणुकांची वेळ आता जवळ येऊ लागल्याने कामे व्हावीत, यासाठी लोकप्रतिनिधी आता जोरदार प्रयत्न करू लागली आहेत. अशा परिस्थितीत आता आचार संहिता सुरू असल्याने कामे तूर्तास थांबवावी लागत आहेत.