Sat, Jul 20, 2019 08:54होमपेज › Marathwada › मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार

Published On: Apr 14 2018 1:52AM | Last Updated: Apr 14 2018 1:44AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्याचे पालकमंत्र्यांसह खासदार, परभणीचे आमदार  शिवसेनेचे आहेत. शिवसेना हा पक्ष सरकारमध्ये सहभागी असतानादेखील भाजपकडून कोणत्याही विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमांत शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांना जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 19 एप्रिलला होणार्‍या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती खा.संजय जाधव यांनी 13 एप्रील रोजी पत्रकार परिषदेत दिली. 

केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांची 800 कोटींची कामे केंद्र सरकारकडून मंजूर झाली आहेत. त्याचबरोबर वीज उपकेंद्रे, मुख्यमंत्री सौरकृषी योजना, अमृत पाणीपुरवठा, प्रधानमंत्री आवास अशा 1 हजार 70 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन कार्यक्रम 19 एप्रिल रोजी येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित केला आहे. यासंदर्भात खा.जाधव यांनी 13 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची या कार्यक्रमाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना खा. जाधव पुढे म्हणाले की, राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर हे संपर्कमंत्री आहेत, परंतु हे संपर्कमंत्रीपद संविधानिक नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे आहेत.

जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला निधी ही बाब स्वागतार्ह आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करणे आपले कर्तव्य आहे. पण जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता जर उद्घाटन कार्यक्रम होत असतील तर  हा कार्यक्रम भाजपचा आहे की सरकारचा हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. मंत्री लोणीकर पदाचा गैरवापर करत आहेत. शासकीय दौर्‍यातून पक्षबांधणीसाठी अधिकार्‍यांचा वापराची ही निती वापरून सरकारमधील सहभागी शिवसेनेला डावलण्याचे काम ते करत आहेत. जालना जिल्ह्यात लोणीकर काय करतात ते माहीत नाही, परंतु परभणी जिल्ह्यात ढवळाढवळ करत असतील तर ते शिवसेना खपवून घेणार नाही. लोणीकर जिल्ह्यात समाधान शिबिरे आयोजित करून जनतेचे नव्हे तर भाजपचे समाधान करत आहेत. यासाठी जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनातील अधिकार्‍यांना हाताशी धरून लोणीकरांनी चालविलेला सावळागोंधळ लक्षात आला आहे, पण भाजपचा हा सावळागोधळ शिवसेना चालू देणार नसून शिवसेना स्टाईलने त्यास प्रत्युत्तर दिले जाईल.

राहुल लोणीकरने अधिकार्‍यांची बैठक घेणे म्हणजे लोकशाहीस काळीमा फासणारे कृत्य ः

सरकार भाजपचे असले तरी भाजपचा पदाधिकारी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेत असेल तर ते लोकशाहिला काळीमा फासणारे कृत्य आहे. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर हे प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेत त्यांना योग्य त्या सूचना देणारे ते कोण आहेत याचे उत्तर जिल्हाधिकार्‍यांनी द्यावे. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांची शासनाने उचलबांगडी करावी अशी मागणीही खा. जाधव यांनी केली.

जिल्हाधिकार्‍यांच्या उदासीनमतेमुळे जनता हतबल 

जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्‍नांवर उदासीनता दाखवत आहेत. बोंडअळी नुकसानीचा, कर्जमाफीचा शेतकर्‍यांना अद्यापही अनुदानाचा लाभ मिळाला नाही. गावागावांत अनेक प्रश्‍न उपस्थित झाले असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे, परंतु जिल्हा प्रशासनातील अधिकारी मात्र संपर्कमंत्र्यांच्या हुजरेगिर्‍या करण्यात मग्‍न राहत आहेत, असा आरोपही खा.जाधव यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला.