गेवराई : प्रतिनिधी
तालुक्यातील गंगावाडी जवळूनगेलेल्या पैठणच्या उजव्या कालव्यात रविवारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. पाटात पाणी असल्याने शोधकार्यास अडथळे येत होते. कालव्यात येणारे पाणी कमी केल्यानंतर सोमवारी सकाळी दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह ठरावीक अंतराने सापडले. यानंतर दोघांच्याही पार्थिवावर गंगावाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महेश गणेश बहीर (वय 17) व राम चंद्रकांत भिताडे (वय 17, दोघे रा. गंगावाडी) असे बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे होती. रविवारी ते क्लासहून गावी परतल्यानंतर दुपारी जेवण करून 4 च्या सुमारास जवळ असलेल्या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते, मात्र या दोघांवरही एकाच वेळी काळाने घाला घातला. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करूनही ते सापडले नव्हते. यानंतर सुरळेगाव येथून कालव्यातील पाणी गोदावरी नदीत वळवले. यामुळे कालव्यातील पाणी कमी झाल्यानंतर सोमवारी सकाळी या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह काही ठराविक अंतरावर आढळून आले. यावेळी नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.
शोकाकुुल वातावरणात अंत्यसंस्कार...
गंगावाडी येथील दोन्ही विद्यार्थी कालव्यात वाहून गेल्याच्या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली होती. या तरुणांचे मृतदेह सापडल्यानंतर पार्थिवावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.