Thu, Apr 25, 2019 18:51होमपेज › Marathwada › लग्न सोहळ्यात वाटली स्पर्धा परीक्षांची पुस्तके

लग्न सोहळ्यात वाटली स्पर्धा परीक्षांची पुस्तके

Published On: Mar 01 2018 9:39AM | Last Updated: Mar 01 2018 9:38AMनंदुरबार : प्रतिनिधी

लग्न समारंभात मानपान आणि इतर गोष्टींवर हजारो रुपयांची उधळण करत शाही विवाह केले जातात. या विवाह सोहळ्याची मोठी चर्चा होते. मात्र, या सर्व खर्चाला फाटा देत लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळून यातून, वाचलेले पैसे पोलीस कल्याण निधी, सैनिक कल्याण निधी आणि गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके दान करुन समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. एक आगळावेगळा विवाह सोहळा नंदुरबारमधील शहादा येथे संपन्न झाला.

शहादा येथील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय भानुदास पाटील यांचा उच्चशिक्षित मुलगा प्रसन्न यांचा विवाह सोहळा शहादा येथे संपन्न झाला. अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी समाजाला एक
नवीन संदेश दिला. जे सैनिक आणि पोलीस आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपले आणि आपल्या देशाचे रक्षण करतात. त्यांच्या प्रती आदर व्यक्त व्हावा आणि लग्न कार्यात वायफळ खर्च होणारा पैसा देश सेवेसाठी लागावा. त्याचसोबत आपल्या भागातील तरुण पिढी अधिक सक्षम व्हावी. म्हणून परिसरात असलेल्या वाचनालय आणि शाळा महाविद्यालयांना त्यांनी जवळपास 3 लाख रुपये देणग्या स्वरुपात देऊन, पुस्तकांसाठी, विद्यार्थ्यांंसाठी मदत करण्यात आली.

पाटील यांच्या या लग्न सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांना हा अभिनव प्रयोग पाहून कौतुक वाटले. कारण, आजपर्यत शाहीविवाहात पाण्यासारखा पैसा खर्च होतो. मात्र, पाटील परिवाराने एक नवीन आदर्श पायंडा पडला आहे. यातून देशप्रेम आणि सैनिकांप्रतीचा आदर दिसून आल्याचे उपस्थित पाहुण्यांनी सांगितले.

पाटील यांनी लग्न सोहळा साधेपणाने करत, इतर जोपैसा वाचलेला आहे त्या पैशांचा उपयोग तरुणांसाठी करण्याचा निर्णय राबवला. पाटील यांनी लग्नकार्यात सैनिक कल्याण निधी, पोलीस कल्याण निधी आणि इतर शैक्षणिक संस्थाना मदत करून एक नवीन आदर्श घालून दिला आहे. त्यांचे अनुकरण इतरांनी देखील करावे, हीच अपेक्षा उपस्थितांनी बोलून दाखवली.