Fri, Apr 26, 2019 19:59होमपेज › Marathwada › बोंडअळी नुकसानसाठी मंत्रालयात धाव  

बोंडअळी नुकसानसाठी मंत्रालयात धाव  

Published On: Mar 06 2018 1:39AM | Last Updated: Mar 06 2018 1:27AMपाटोदा : प्रतिनिधी

कापूस पिकावरील बोंडअळीच्या नुकसान भरपाईप्रकरणी पाटोद्यातील शेतकर्‍यांनी थेट मंत्रालयातच धाव घेतली आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील शनिवारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. याप्रश्‍नी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी भाई विष्णूपंत घोलपसह कार्यकर्त्यांनी केली.

पाटोदा व शिरूर तालुक्यात गेल्या खरीप हंगामात एक लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली होती. यामध्ये जवळ जवळ सर्वच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भावाने मोठे नुकसान झाले होते. यासाठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज आलेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे शासनाने प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, मात्र काही बेजाबदार अधिकार्‍यांनी कार्यालयामध्ये बसूनच कागदावर आकडेवारी भरत माहिती पाठविल्याचा आरोप भाई विष्णूपंत घोलपसह शेतकर्‍यांनी केला आहे.  

या हलगर्जी पणामुळे तालुक्यातील शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले. याप्रश्‍नी दोषींना शासनाने निलंबीत करावे यासाठी पाटोद्यातील शेतकरी मंत्रालयात गेले. तेथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन शेतकर्‍यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन भाई विष्णूपंत घोलप यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिले. याप्रश्‍नी विधानसभा, विधान परिषदेत आवाज उठविण्यात येईल असे आश्‍वासन जयंत पाटील यांनी दिल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

बोंडअळीप्रश्‍नी पिकांचे बेजबाबदारपणे पंचनामे करणार्‍या सबंधित अधिकार्‍यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे पाटोदा उपविभागीय  अधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. याबाबत  तालुका कृषी अधिकारी यांंनी सांगितले की, वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात आला आहे. जिल्हाकृषी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या अहवालात पाटोदा, शिरूर, निरंक दाखविले आहे.